अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. १६ ते १९ मे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
(हेही वाचा – गेल्या ५० वर्षात मेमध्ये १०७ वेळा नागपूरकरांनी सोसली उष्णतेची लाट!)
१५ मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर १५ मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.
पूर्व मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण
हवामानतज्ञांच्या मते, पूर्व मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे २७ मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात विषुववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपावणारे दमदार पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी झटक्याखाली पुढील पाच दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील सात राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पूर्व मोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community