Yes Bank-DHFL Case: संजय छाब्रियांसह अविनाश भोसलेंची ४१५ कोटींची संपत्ती ED कडून जप्त

156

येस बँक-DHFL फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करत, ईडीने संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले यांची मालमत्ता जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने संजय छाब्रिया यांची २५१ कोटी रुपये आणि अविनाश भोसले यांची १६४ कोटी रुपये (एकूण ४१५ कोटी रुपयांची मालमत्ता) जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रेडियस डेव्हलपर्सचे संजय छाब्रिया आणि एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरचे अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा –हल्ल्यानंतर सामंतांचा ठाकरेंवर निशाणा! म्हणाले, “सोज्वळ चेहऱ्यापलीकडचे प्रकार…” )

कोणती संपत्ती ईडीने केली जप्त

संजय छाब्रिया यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील ११६.५ कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे. याशिवाय सांताक्रूझ येथे असलेला ३ कोटी रुपयांचा फ्लॅट, दिल्ली विमानतळावर असलेल्या छाब्रियाच्या हॉटेलमधून १३.६७ कोटी रुपयांचा नफा आणि ३.१० कोटी रुपयांच्या तीन लक्झरी कारचाही समावेश आहे. तर अविनाश भोसले यांच्याकडे मुंबईत १०२.८ कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट आहे. याशिवाय पुण्यातील १४.६५ आणि २९.२४ कोटी रुपयांची जमीन, नागपुरातील १५.५२ कोटी रुपयांची आणि १.४५ कोटी रुपयांची आणखी एक जमीन जप्त करण्यात आली आहे.

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने येस बँकेचे राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवन आणि धीरज वाधवन प्रवर्तकांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. राणा कपूरने मेसर्स डीएचएफएलचे प्रवर्तक संचालक कपिल वाधवन आणि इतरांसोबत येस बँक लिमिटेडद्वारे मेसर्स डीएचएफएलला आर्थिक सहाय्य देण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला होता.

अलीकडेच, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने DHFL शी संबंधित ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांच्या आवारातून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले होते. २०११ मध्ये वर्वा एव्हिएशनने AW109AP हेलिकॉप्टर ३६ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.