तुम्ही सावरकरांचा विचार संपवू शकणार नाही – शरद पोंक्षे

97

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तुम्ही कितीही अपमान केला, त्यांच्यावर कितीही आरोप लावले, इतिहासाच्या पुस्तकांमधून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तरी ‘सावरकरी विचार’ तुम्ही कधीही संपवू शकणार नाही, कारण हिंदुत्व, राष्ट्रप्रेम ही सावरकरांची त्यांच्या विचारांची ताकद होती, असे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. विश्वकेसरी फाउंडेशनच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी नागपुरातील सायंटिफिक सभागृहात ‘सावरकर विचारदर्शन’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पोंक्षे यांचा विश्वकेसरी फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. कर्करोगाशी लढताना मोठे आर्थिक संकट समोर उभे राहिले होते. त्यावेळी विश्वकेसरीसारख्या अनेक संस्था पाठीशी उभ्या राहिल्या, असे म्हणत शरद पोक्षे यांनी विश्वकेसरीच्या समाजातील गरजू व गरीब बांधवांना केलेल्या मदतकार्याचे कौतूक केले.

लवकरच हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाणार 

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, सावरकरांना हा अख्खा हिंदुस्तान आपला वाटायचा म्हणून त्याच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले. त्यांना हिंदूराष्ट्रवाद पाहिजे होता, पण कॉंग्रेस हिंदी राष्ट्रवादावर ठाम होती. त्यांना मुस्लीम, ख्रिश्चन यांची व्होटबँक पाहिजे होती. हिंदू हा धर्म असून निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. त्यामुळे अनेक आक्रमणे होऊनही हा धर्म मिटू शकला नाही. सावरकरांनी मांडलेल्या हिंदू राष्ट्राची संकल्पना आता लवकरच पूर्ण होणार असून, आपले राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा: शिवसेनेने जाहीर केली संजय पवार यांना उमेदवारी; संभाजी राजेंना पाठिंबा नाहीच )

या मान्यवरांची उपस्थिती 

कार्यक्रमाला डॉ. पी. के. देशपांडे, डॉ. अशोक देशपांडे, स्वाती देशपांडे, अभिनेते देवेंद्र दोडके, ब्रिगेडियर सुनील गावपांडे, भुपेंद्र शहाणे, शशीमोहन जोशी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता शेलगावकर यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.