जिवंत सापाचे तुकडे करुन तरुण पसार 

151

शेतात जमलेल्या तरुणांना एका लाकडी काठीत अडकलेल्या धामण सापाचे चक्क तुकडे करुन काठीतून त्याला बाहेर काढल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात उस्मानाबाद येथे घडली. सापाचे तुकडे करतानाचा व्हिडिओ घटनेत सहभागी असलेल्या एका तरुणाने समाजमाध्यमांवर पोस्ट केल्यानंतर ही घटना उजेडात आली. हे प्रकरण अंगलट येताच व्हिडिओतील सर्व तरुण गायब झाले आहेत.

काय घडला प्रकार?

गुरुवारी रात्री काठी कापून धामण सापाचे तुकडे बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली. उस्मानाद येथील शेतात हा प्रकार घडल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. यातील दोन तरुणांची ओळख पटली असून, दोघेही उमरगा तालुक्यातील येणेगूर गावातील आहेत. हा प्रकार केवळ आनंद उपभोगण्यासाठी केल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसून येते, मात्र मुक्या प्राण्याला नाहक त्रास देणे, सरपटणा-या प्राण्याचे तुकडे करणे हे निंदनीय असल्याची प्रतिक्रिया वन्यजीव वर्तुळातून येत आहे.

(हेही वाचा – ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या १ रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन देणार…)

हा प्रकार उघडीस आल्यानंतर उस्मानाबाद येथील ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन, मुंबईतील प्लान्ट एण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी, पुणे तसेच नाशिक येथील प्राणीप्रेमी संस्थांनी निषेध नोंदवला आहे. त्यापैकी प्लान्ट एण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीने वनविभागाकडे रितसर तक्रार नोंदवली. घटनेला तीन-चार दिवस उलटूनही वनविभागाला आरोपी सापडलेले नाहीत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी आपण लेखी तक्रार आज दाखल करत असल्याची माहिती ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचे सचिव अभिजीत गायकवाड यांनी दिली.

धामणला मारणे हा वन्यजीव गुन्हा

धामण ही बिनविषारी सापाची प्रजाती भारतात प्रामुख्याने आढळून येते. भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत धामणला मारणे, त्रास देणे तसेच तस्करी हा वन्यजीव गुन्हा ठरतो. हा प्रकार राज्यात कुठेही आढळल्यास १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाईन क्रमांकाकडे तक्रार नोंदवावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.