जागतिक मंदीचा परिणाम भारतातील खासगी क्षेत्रातही दिसू लागला आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करणाऱ्या ट्विटर, मेटा, अॅमेझॉन कंपन्याच्या यादीत आता झोमॅटो कंपनीची ही भर पडली आहे. झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. फूड एग्रीगेटर अॅप झोमॅटोने जवळपास १०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी कंपनीच्या उत्पादन, टेक, कॅटलॉग आणि मार्केटिंग अशा विविध विभागांशी संबंधित आहेत.
कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावर झोमॅटो कंपनी ही कपात केली जाणार असून ही नियमित प्रक्रिया आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. या कंपनीमध्ये सध्या ३ हजार ८०० कर्मचारी आहेत. याआधी मे २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याने कंपनीने साधारण १३ टक्के म्हणजे ५२० कर्मचाऱ्यांची कपात केली होती.
(हेही वाचा – किशोरी पेडणेकरांच्या घरावर होणार कारवाई, काय आहे कारण?)
गेल्या आठवड्यात कंपनीच्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. झोमॅटोचे सह संस्थापक मोहित गुप्ता यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर नवापक्रम विभाग प्रमुख गंजू आणि सिद्धार्थ झेवर यांनी या महिन्याच्या सुरूवातीला राजीनामा दिला होता. यावेळी झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी एक बैठक घेऊन चांगली कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा इशारा दिला होता.