King of Cricket : आपल्या ‘विराट’ कारकीर्दीचा हा प्रवास कोहलीने कसा शक्य केला?

विराट कोहलीची तंदुरुस्ती आणि त्यामुळे साध्य झालेली लंबी चौडी कारकीर्द याची नेहमीच चर्चा होते. त्यासाठी आपल्या खेळात आणि जीवनशैलीत त्याने नेमके कोणते बदल केले, हे त्याने अलीकडे एका मुलाखतीत सांगितलं आहे

124
King of Cricket : आपल्या ‘विराट’ कारकीर्दीचा हा प्रवास कोहलीने कसा शक्य केला?
King of Cricket : आपल्या ‘विराट’ कारकीर्दीचा हा प्रवास कोहलीने कसा शक्य केला?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीची तंदुरुस्ती आणि त्यामुळे साध्य झालेली लंबी चौडी कारकीर्द याची नेहमीच चर्चा होते. त्यासाठी आपल्या खेळात आणि जीवनशैलीत त्याने नेमके कोणते बदल केले, हे त्याने अलीकडे एका मुलाखतीत सांगितलं आहे. विराट कोहलीला कौतुकाने किंग ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. गोलंदाजांवर संपूर्ण वर्चस्व गाजवायला आवडणारा आणि कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारा विराट सचिन तेंडुलकर नंतरचा जगभराच सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. पण, खरंतर त्याची शैली राजासारखी रुबाबात धावा करण्याची नाही. तर एकेरी-दुहेरी धावा पळून अधे-मधे चौकार चोरणारी खेळी तो रचतो आणि म्हणता म्हणता शतकापर्यंत पोहोचतो. (King of Cricket)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० च्या वर धावा करणाऱ्या विराटलाही मध्ये खराब फॉर्मने सतावलं होतं. त्याच्या किंग असण्यालाही धोका निर्माण झाला होता. बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा फाफ द्यू प्लेसिस, क्सासेन, बेन स्टोक्स यांची तुलना त्याच्याशी होऊ लागली. पण, या विश्वचषकात पुन्हा एकदा विराटने आपला जलवा दाखवून दिला आहे. भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही त्याची आणि त्याच्या संभाव्य विक्रमाचीच चर्चा आहे. सांगून विश्वास बसणार नाही. पण, आपण इथपर्यंत पोहोचू आणि आपल्या नावावर इतके विक्रम लागतील, असा विचारही विराट कोहलीने केला नव्हता. ‘मला फक्त संघासाठी चांगली कामगिरी करायची होती आणि संघाच्या विजयात माझा भरपूर वाटा असावा, इतकाच विचार मी करायचो,’ असं विराटने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. (King of Cricket)

विराट आता ३४ वर्षांचा आहे आणि मागची २३ वर्षं अव्याहत खेळतोय. त्या दरम्यान त्याने २६,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. तर सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी अलीकडेच त्याने केलीय. या प्रदीर्घ कामगिरीसाठी तो शिस्त आणि जीवनशैलीतील काही बदलांना त्याचं श्रेय देतो. (King of Cricket)

‘माझ्याकडे क्रिकेट खेळण्याची आणि सतत स्वत:मध्ये सुधारणा करण्याची भूक होतीच. पण, सुरुवातीच्या काळात शिस्त आणि व्यावसायिकता नव्हती, असं माझ्या लक्षात आलं. मग हळू हळू मी हे बदल खेळात केले,’ असं विराटने या मुलाखतीत सांगितलं. (King of Cricket)

‘खेळाला तुम्ही घेत असलेली मेहनत कळते आणि तेव्हाच खेळ तुमची कदर करतो. मला तरी क्रिकेट खेळताना तोच अनुभव आला आहे. मी जेव्हा माझ्यात शिस्त आणली. सकारात्मक बदल केले आणि केलेले बदल, शिस्त टिकवली, तेव्हाच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी क्रिकेटसाठी १०० टक्के दिले आणि जे केलं ते टिकवलं. त्याचंच फळ मला आता मिळत आहे,’ असं विराट कोहलीने आवर्जून सांगितलं. (King of Cricket)

(हेही वाचा – Army Soldiers: पूंछ जिल्ह्यात भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्कराचे ३ सैनिक जखमी)

विराटने एका दुखापतीतून बाहेर पडताना व्हिगन होण्याचं ठरवलं होतं. शरीरातील एक नस दुखावली असता ती बरी होण्यासाठी त्याला काहींनी व्हिगन डाएट घेण्याचा सल्ला दिला होता. आताही तो व्हिगनच आहे. व्यायाम आणि सरावाच्या वेळा तो चुकवत नाही आणि त्याचा पूर्ण फोकस क्रिकेटवर असतो. या विश्वचषकात विराटने आतापर्यंत ६ डावांमध्ये ३५४ धावा केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी विराटला अजून एक शतक हवं आहे. ते याच विश्वचषकात व्हावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. (King of Cricket)

भारताचा पुढील मुकाबला २ नोव्हेंबरला श्रीलंकेबरोबर होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध विराटने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची १० शतकं या संघाविरुद्ध आहेत. श्रीलंकेविरुद्ध ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने ६२ धावांच्या सरासरीने २५०६ धावा केल्या आहेत. त्यामुळे आताही मुंबईत विराटकडून शतकाची अपेक्षा असेल आणि सामन्याची चर्चा विराटच्या शतकासाठीच आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईतला सामना असल्यामुळे स्टेडिअममध्ये हजर असेल आणि अशा वातावरणात विराटला बघायला लोक उत्सुक आहेत. (King of Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.