Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला अजूनही आशा भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची

Ajinkya Rahane : कसोटी क्रिकेट आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचं अजिंक्यने म्हटलं आहे.

25
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला अजूनही आशा भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची
  • ऋजुता लुकतुके

मुंबईने रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) दुसऱ्या डावातील शतकाचं महत्त्व मोठं होतं. या विजयानंतर ३६ वर्षीय रहाणेनं कसोटी क्रिकेटवरील आपलं प्रेम पुन्हा एकदा बोलून दाखवलं आहे आणि भारतीय संघात पुनरागमनाची आशा अजून सोडलेली नाही, असंही अजिंक्यने सांगितलं. जुलै २०२३ मध्ये अजिंक्य भारतीय संघात शेवटचा खेळला होता. या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र सगळ्याच प्रकारात तो चांगल्या धावा करतोय.

‘माझ्यातील क्रिकेट अजून बाकी आहे. देशांतर्गत क्रिकेटने मला सर्व काही दिलं आहे. खेळावर माझं नितांत प्रेम आहे. आणि कसोटी क्रिकेटला मी सर्वोच्च प्राधान्य देतो. खेळावरील माझं प्रेम कायम अबाधित राहील,’ असं अजिंक्य (Ajinkya Rahane) सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

(हेही वाचा – Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल)

रहाणेच्या (Ajinkya Rahane) स्वत:च्या फॉर्मबरोबरच त्याच्या नेतृत्व गुणांचंही नेहमीच कौतुक होतं. मुंबईसाठी मागच्या १० डावांमध्ये त्याने तीन वेळा नव्वदी पार केली आहे. दोनदा ८० धावांचा टप्पा पार केला आहे आणि आता महत्त्वाच्या बाद फेरीच्या सामन्यात त्याने शतक करून मुंबईला विजय मिळवून दिला आहे. रणजी करंडक आणि इराणी करंडकात मुंबईला विजय मिळवून देताना रहाणेच्या नेतृत्व गुणांचंही कौतुक झालं. ‘मी कायम १०० टक्के सकारात्मक असतो आणि संघासाठी पूर्ण प्रयत्न करतो. माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे,’ असं त्यावर अजिंक्य म्हणाला.

रहाणे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचाईजीकडून खेळणार आहे आणि मुंबईचं नेतृत्व करताना रहाणेनं (Ajinkya Rahane) दाखवलेली चमक बघून कोलकाता संघाचं नेतृत्वही त्याच्याकडे येईल अशी चर्चा सुरू आहे. पण, ही चर्चा अजिंक्यने फेटाळून लावली. ‘संघ प्रशासनाशी अशा कुठल्याही चर्चा सुरू नाहीएत. त्यामुळे यावर बोलणं योग्य होणार नाही,’ इतकंच रहाणे म्हणाला. सध्या मुंबईच्या उपांत्य सामन्यावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं रहाणेनं स्पष्ट केलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.