ऋजुता लुकतुके
श्रीलंकेत सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. पण, स्पर्धेत पावसाने वारंवार व्यत्यय आणला आहे. त्यामुळे भारत – पाक सह सर्व महत्त्वाचे सामने एक तर पावसामुळे वाहून गेले किंवा ते कमी षटकांचे करावे लागले. शिवाय अलीकडे राजधानी कोलंबोत प्रचंड पाऊस होत आहे. त्यामुळे सुपर ४ चे सामने कोलंबो ऐवजी हँबोनटोटा इथं घेण्याचा विचार आयोजक करत होते. पण, आता कोलंबोतली पावसाची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट असोसिएशनने स्पर्धा ठरल्यासारखी कोलंबोत पार पडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आशियाई क्रिकेट संघटना, श्रीलंकन क्रिकेट संघटना, पाक क्रिकेट संघटना तसंच स्पर्धेचे टिव्ही प्रसारक यांच्याशी विचार विनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा-Ambabai Temple: अंबाबाई मंदिर परिसर संगीतमय होणार, प्रशासनाकडून लवकरच ‘संगीत खांबां’ची रचना)
इतक्या कमी वेळेत स्पर्धेचं ठिकाण बदललं तर अवजड प्रक्षेपण साधनं नवीन ठिकाणी पुन्हा नेऊन बसवणं कठीण पडेल, असं टीव्ही प्रसारण वाहिन्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कोलंबोतच उर्वरित सामने भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच आता कोलंबोतील पाऊस परिस्थितीही सुधारत आहे. आशिया चषकात १० सप्टेंबरपासून पाच सुपर ४ चे सामने होणार आहेत. आणि श्रीलंकन बोर्डानेच यापूर्वी हे सामने कोलंबो ऐवजी हँबबोनटोटा इथं घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
आशिया चषकात आता सुपर ४ साखळीतील ५ सामने तसंच एक अंतिम सामना बाकी आहे. भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश हे चार संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत. सुपर ४ चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे. त्यामुळे यंदा या स्पर्धेत हे पारंपरिक प्रतिस्पर्धी दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. दोन्ही संघांदरम्यानचा पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. हा सामना कँडी इथं झाला. पहिल्या डावात भारताने सर्वबाद २६६ धावा केल्या. पण, मध्यंतराला सुरू झालेला पाऊस थांबलाच नाही. आणि त्यामुळे उर्वरित सामना रद्द करावा लागला. त्यानंतर भारताने नेपाळविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवत सुपर ४मध्ये प्रवेश केला. तर पाकिस्ताननेही नेपाळचा पराभव करत सुपर ४ गाठली आहे. आता उर्वरित सामने कोलंबोत प्रेमदासा स्टेडिअमवर रंगणार आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community