- ऋजुता लुकतुके
ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना एक दिवसाने मागे ढकलण्यात आला आहे. सामन्याची नवीन तारीख आणि वेळ बघूया. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना आता पूर्वीच्या १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. ठरल्याप्रमाणे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच सामना पार पडेल. पण, त्याची तारीख बदलली आहे.
१५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. गुजरातमध्ये जैन बांधवांचा हा मोठा सण आहे. अशावेळी १५ ऑक्टोबरला सामन्यासाठी सुरक्षा पोहोचवायला अहमदाबाद पोलिसांनी असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे सामन्याचा दिवस बदलण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट मंडळाने आयसीसीसमोर ठेवला होता. आयसीसीने ९ ऑगस्टला प्रस्ताव स्वीकारत नवीन तारीख जाहीर केली आहे. सामन्याची वेळ तीच म्हणजे दुपारी दोनची राहणार आहे. हा दिवस-रात्र होणारा सामना आहे. भारत-पाक सामन्याबरोबरच इतर आठ सामन्यांच्या वेळा आणि तारखा बदलल्याची घोषणा आयसीसीने एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे. विश्वचषकाच्या वेळेत भारतात सणासुदीचे दिवस असल्यामुळे सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागल्याचं समजतंय अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड हा सामना आता नवी दिल्लीतच पण, १४ ऐवजी १५ ऑक्टोबरला खेळवला जाईल. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना आता हैद्राबाद इथं १२ ऐवजी १० ऑक्टोबरला होईल. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध द आफ्रिका हा तगड्या संघांमधील सामना लखनौला १३ ऑक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबरला होईल.
Nine fixtures have been rescheduled for #CWC23.
Details 👇
— ICC (@ICC) August 9, 2023
तर १४ ऑक्टोबर रोजी चेन्नईत होणारा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हा सामना आता १३ ऑक्टोबरला खेळवला जाईल. आणि तो दिवस-रात्र असेल. तर इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या धरमशालामध्ये होणाऱ्या सामन्याची वेळ बदलण्यात आलीय. आधी दिवस-रात्र असलेला हा सामना आता सकाळी साडेदहाला सुरू होईल. साखळी स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यातले तीन सामनेही आता नवीन वेळापत्रकानुसार होतील. १२ नोव्हेंबरला होणारी दोन्ही सामने आता ११ नोव्हेंबरला आधीच्या ठरलेल्या वेळी होतील. तर भारताचा शेवटचा साखळी सामना आता १२ ऐवजी ११ नोव्हेंबरला होईल. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ठरल्याप्रमाणे ५ ऑक्टोबरला अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. गेल्या विश्वचषकातील अंतिम फेरीतले दोन संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा पहिला सामना या मैदानावर दुपारी दोन वाजता खेळवला जाईल. तर अंतिम सामना इथंच १९ नोव्हेंबरला होईल.
(हेही वाचा – CAG Report : आयुष्मान भारत योजनेत घोटाळा; एका मोबाईल क्रमाकांशी 7.50 लाख लोक लिंक)
एकदिवसीय विश्वचषकाचं बदललेलं वेळापत्रक –
- १० ऑक्टोबर – इंग्लंड वि. बांगलादेश, धरमशाला (सकाळी १०.३०)
- १० ऑक्टोबर – पाकिस्तान वि. श्रीलंका, हैद्रबाद (दुपारी २)
- १२ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. द आफ्रिका, लखनौ (दुपारी २)
- १३ ऑक्टोबर – न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई (दुपारी २)
- १४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद (दुपारी २)
- १५ ऑक्टोबर – इंग्लंड वि. अफगाणिस्तान, नवी दिल्ली (दुपारी २)
- ११ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे (सकाळी १०.३०)
- १२ नोव्हेंबर – इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता (दुपारी २)
- १३ नोव्हेंबर – भारत वि. नेदरलँड्स, बेंगळुरू (दुपारी २)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community