- दीपाली देशपांडे
वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत (Sports Field) यश, क्रीडा क्षेत्रात झालेली प्रगती हा समाजाचा आरसा आहे. आपला देश स्वातंत्र्यानंतरच्या काळात आता विकसित होत गेला. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मिळालेले घवघवीत यश हे देशाने केलेल्या सर्वंकष प्रगतीचे पडसाद आहेत. हे एकाएकी झालेले नाही. यंदा वेगवेगळ्या खेळात पदके मिळाली आहेत, हे अजून चांगले आहे. टेनिस, गोल्फ, नेमबाजी या खेळांत साधारणपणे उच्च मध्यमवर्गीय मुले सहभागी होतात, तर बॉक्सिंग, ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांमध्ये साधारणपणे समाजाच्या खालच्या वर्गातील मुलेही सहभागी होऊ शकतात. यंदा या सर्व प्रकारांत भारतीय खेळाडूंना यश मिळाले आहे. हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे लक्षण आहे.
‘सिस्टिम जनरेटेड’ यश
काही वर्षांपूर्वी हॉकी सॊडले, तर क्रीडा क्षेत्रासाठी फारशा संधी, सुविधा विकसित झालेल्या नव्हत्या. लोक क्रीडा क्षेत्रासाठी पुढेही येत नव्हते. आता सरकारचाही सक्रीय सहभाग आहे. अनेक ठिकाणी क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा भरपूर निर्माण झाल्या आहेत. खेळाडूंसाठी भरपूर योजना चालू झाल्या आहेत. क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापन (sports science) या क्षेत्रात आता अभ्यासक्रम निर्माण झाले आहेत. त्याचाही खेळाडूंना मोठा आधार मिळत आहे. थोडक्यात गेल्या काही वर्षांपासून क्रीडा स्पर्धांमध्ये मिळत असलेले यश हे ‘सिस्टिम जनरेटेड’ यश आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या समाजात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, अशी चांगली यंत्रणा तयार झाल्यामुळे मिळालेले हे यश आहे. यंदा मिळालेली मेडल्स ही व्यक्तिगत आणि सांघिक अशा दोन्ही क्रीडा प्रकारांत मिळालेली आहेत. जेव्हा सांघिक खेळांमध्ये यश मिळू लागते, तेव्हाच खरी प्रगती झाली असे मानले जाते.
१९९० या वर्षीच्या सुविधा आणि आताच्या सुविधा यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. खेळाडूंचा आहार, त्यांना खेळादरम्यान होऊ शकणारे शारीरिक त्रास याविषयी सजग करणे, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. आता कोणत्याही क्रीडा संकुलात खेळाडूंच्या आहाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाते. या सुविधा पूर्वी नव्हत्या. इंटरनेटमुळे चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व माहिती आपल्याला सहज उपलब्ध होते. या सगळ्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतो.
(हेही वाचा – Central Railway : परळ, विक्रोळी,कांजूरमार्ग स्थानकाचे काम प्रगतीपथावर)
खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
गेल्या ७-८ वर्षात क्रीडाक्षेत्राविषयी चांगले कोर्स उपलब्ध झाले आहेत. बहुतेक सगळ्या खेळांमध्ये जुन्या प्रथितयश खेळाडूंनी त्या त्या खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमी चालू केल्या आहेत. काही खेळाडू त्याच खेळांच्या राष्ट्रीय समित्यांमध्ये नियुक्त झाले आहेत. त्यांच्या अनुभवाचाही फायदा होतो. या सगळ्यामुळे नवीन पिढीचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आमच्या पिढीपर्यंत सगळ्या गोष्टी मोठ्या कष्टाने, संघर्षाने मिळवाव्या लागल्या आहेत. स्पर्धेत उतरताना कधीतरी मधेच ‘आपल्याला जमेल की नाही’, असे वाटायचे. त्या वेळी अनेक क्षेत्रांत देशाला नव्याने यश मिळाले. पूर्वीच्या स्ट्रगलमध्ये आणि आताच्या स्ट्रगलमध्ये खूप फरक आहे. पूर्वीची परिस्थिती कठीण होती; मात्र स्पर्धा कमी होती. ठराविकच जण असायचे. सुविधाही कमीच होत्या. कोणाकडेच फार साधने नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या पिढीने विकसित भारतच पाहिला आहे. त्यामुळे ‘मी जिंकण्यासाठीच जन्माला आलो आहे’, असे त्यांना वाटते. ऑलिम्पिकला जायचे आहे, असे ठरवूनच ते या क्षेत्रात येतात. त्यासाठी मेहनत करण्याची पण त्यांची तयारी असते.
स्पर्धेचा सामना करत टिकून राहाण्याचे आव्हान
आता सुविधा निर्माण झाल्या आहेत; परंतु स्पर्धा इतकी वाढली आहे की, सतत वरच्या स्तराला टिकून राहणे कठीण आहे; कारण सतत नवीन खेळाडू या क्षेत्रात येत असतात. सगळ्या सुविधा आणि साधने आहेत. पूर्वी आमच्या पिढीपर्यंत फक्त खेळातच नाही, तर आयुष्याच्या अनेक टप्प्यावर संघर्ष हा जगण्याचा एक भागच होता. आताच्या मुलांना सर्व गोष्टी सहजतेने उपलब्ध आहेत. अशा वेळी खेळातील चढ-उतार सहन करत सतत प्रोत्साहित राहणे, हे सध्याच्या पिढीसमोरील मोठे आव्हान आहे.
क्रीडा क्षेत्र हे एक इंडस्ट्री बनत आहे !
सध्या क्रीडा क्षेत्र हे एक इंडस्ट्री म्हणून पुढे आले आहे. जागतिक स्तरावर जिंकलेले जरी २-३ जण असले, तरी त्याची तयारी करणारे आणि अन्य स्तरावर खेळणारे अनेक खेळाडू असतात. ते सगळे जण मिळून या खेळांची कमान सांभाळणार आहेत. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मुलांना जसे प्रशिक्षक लागतात, तसेच गावोगावी खेळणाऱ्या मुलांनाही प्रशिक्षकांची आवश्यकता असते. त्यासोबत आता स्पोर्ट्स इक्विपमेंट्स भारतात तयार होत आहेत. पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यांचे खेळाडूंसाठी आहारतज्ञ, सल्लागार, प्रशिक्षण केंद्रे, महाविद्यालये अशा अनेक संधी या क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. थोडक्यात क्रीडा क्षेत्र हे एक इंडस्ट्री म्हणून पुढे येत आहेत.
(लेखिका प्रथितयश नेमबाज आहेत. त्यांनी २००४ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रायफल नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. सध्या त्या भारताच्या सीनियर नेमबाजी संघाच्या प्रमुख प्रशिक्षक आहेत.)
Join Our WhatsApp Community