Ashwin Retires : ‘अश्विनला मालिकेच्या मध्यावर निवृत्त व्हायला दिलं नसतं,’ – कपिल देव

Ashwin Retires : अश्विनच्या निवृत्तीवरून उलटसुलट चर्चा थांबलेल्या नाहीत.

44
Ashwin Retires : ‘अश्विनला मालिकेच्या मध्यावर निवृत्त व्हायला दिलं नसतं,’ - कपिल देव
  • ऋजुता लुकतुके

रवीचंद्रन अश्विनच्या तडकाफडकी निवृत्तीवरून अजूनही उलटसुलट चर्चा सुरूच आहेत. महत्त्वाच्या मालिकेच्या मध्यावर अश्विनला माघारी फिरू दिल्यामुळे कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. माजी कर्णधार कपिल देवने आता याविषयी नवीन विधान केलं आहे. ‘मालिकेच्या मध्यावर अश्विनला जाऊ दिलं नसतं,’ असं कपिल म्हणतात. तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने, ‘विराट असता तर त्याने अश्विनला असं जाऊ दिलं नसतं,’ असं म्हटलं आहे. (Ashwin Retires)

ब्रिस्बेन कसोटी संपल्यावर अश्विनने ड्रेसिंग रुममध्ये सहकाऱ्यांसमोर ५ मिनिटं संवाद साधला आणि तो तडक हॉटेलवर गेला. तिथून त्याच रात्री त्याने भारतासाठी परतीचं विमान पकडलं. अश्विनसारख्या खेळाडूला अशाप्रकारे निरोप द्यायला नको होता, असं कपिलचं म्हणणं आहे. (Ashwin Retires)

(हेही वाचा – EPF Withdrawal : ईपीएफमधील पैसे आता एटीएममधून काढता येणार; काय आहे प्रक्रिया?)

‘आपली पुढची पिढी ही आपल्यापेक्षा हुशार हवी. चांगली हवी. तसं झालं नाही तर जग पुढे जाणार नाही. सुनील गावस्करांनंतर आपल्याकडे सचिन तेंडुलकर निपजला. तो गेल्यावर त्यांच्यासारखा दुसरा खेळाडू तयार होईल असं वाटलं नव्हतं. पण, अश्विनने तिथपर्यंत मजल मारली. इतक्या मोठ्या खेळाडूला असा पाच मिनिटांत निरोप देणं योग्य नाही. मी असतो, तर असं होऊ दिलं नसतं. त्याला मान दिला गेला पाहिजे,’ असं कपिल यांनी एएनआय वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

दुसरीकडे पाकचा माजी क्रिकेटपटू बासित अलीनेही याच मुद्यावर बोट ठेवलं आहे. ‘विराट कर्णधार असता, तर त्याने अश्विनला निदान ही मालिका संपेपर्यंत थांबून ठेवलं असतं. महत्त्वाच्या मालिकेत अश्विनसारखा खेळाडू निदान ड्रेसिंग रुममध्ये असण्यानेही फरक पडतो,’ असं बासित अली म्हणाला.

सुनील गावस्कर यांनीही आगामी सिडनी कसोटीत रवी अश्विनचा उपयोग झाला असता, असंच मत व्यक्त केलं आहे. पण, भारतीय संघाच्या नवीन बांधणीत संघात निवडीची शक्यता दिसत नसल्यानेच अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याचं समजतंय. (Ashwin Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.