- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यावर २४ तासांच्या आतच रवीचंद्रन अश्विन चेन्नईत परतला आहे आणि आल्या आल्या काही तासांत त्याने पत्रकार परिषद घेतली. आधीच अश्विनचा निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी जाहीर केलेला होता. त्यातच आता एका प्रश्नाला उत्तर देताना अश्विनने निवृत्तीचा निर्णय ‘त्या क्षणी’ घेतलेला होता, असं म्हटलं आहे. पण, हे विधान रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलियात केलेल्या विधानाला खोडून काढणारं आहे. त्यामुळे एकूणच अश्विनच्या निवृत्तीचं गूढ वाढलं आहे. ‘अश्विन पर्थ कसोटीनंतर निवृत्त होणार होता. मी त्याला ॲडलेड कसोटीत खेळण्यासाठी राजी केलं,’ असं रोहित बुधवारी ब्रिस्बेनमध्ये म्हणाला होता. (Ashwin Retires)
(हेही वाचा – Gateway of India boat accident प्रकरणातील दोन जण अद्याप बेपत्ता)
३८ वर्षीय अश्विनला चेन्नई विमानतळावरच पत्रकारांनी घेराव घातला होता. पण, तेव्हा तो तातडीने त्याच्या गाडीत जाऊन बसला. तिथे त्याची पत्नी प्रीती आणि दोन मुली त्याची वाट बघत होत्या. पण, घरी पोहोचल्यावर त्याने आधी पालकांची भेट घेतली आणि लगेचच उपस्थित पत्रकारांशी त्याने संवाद साधला. ‘काही जणांना निवृत्तीचा निर्णय खूप भावूक करून जातो. पण, माझ्यासाठी हा निर्णय अगदी शांतपणे घेतलेला निर्णय आहे आणि तो निर्णय जाहीर केल्यावर मला जास्त शांत वाटतंय, मोकळं वाटतंय. गेले काही दिवस हा विचार मनात घोळत होता. पण, ब्रिस्बेनमध्ये अगदी सहज एका क्षणात मी तो निर्णय घेऊन टाकला,’ असं अश्विन म्हणाला. (Ashwin Retires)
(हेही वाचा – ICC Test Championship : भारतीय संघ अजूनही आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठू शकतो?)
चेन्नईत झालेल्या स्वागतामुळे अश्विन भारावून गेला होता. ‘घरचे लोक येतील स्वागताला हे ठाऊक होतं. पण, इतकं भारदस्त स्वागत होईल हे माहीत नव्हतं. २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला, तेव्हा माझं चेन्नईत असं स्वागत झालं होतं आणि आज लोकांचं प्रेम बघून मला भरून आलं आहे,’ असं अश्विन म्हणाला. निवृत्तीचा निर्णय ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी घेतला, असं सांगणारा अश्विन पुढे हे ही सांगतो की, ‘त्याच्या मनात आता कुठलीही खंत किंवा दु:ख नाही. संघाचं नेतृत्व करण्याची ईर्ष्या कधीच नव्हती. त्यामुळे ते करायला मिळालं नाही, असं वाटतंही नाही. आता फक्त उर्वरित आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे आणि समोर असलेलं क्रिकेट मनापासून खेळायचं आहे,’ असं शेवटी अश्विन म्हणाला. (Ashwin Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community