IND Vs PAK Asia Cup 2022:पांड्याने तोडल्या पाकिस्तानच्या तंगड्या, भारताची आशिया चषकात विजयी सलामी

106

रविवारी झालेल्या आशिया चषक सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताने विजयी सलामी दिली आहे. अटीतटीच्या या सामन्यात भारताने 5 गडी राखत विजय मिळवला आणि टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

या सामन्यात बेधडक हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा हे विजयाचे शिल्पकार ठरले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने मिळवलेल्या विजयामुळे संपूर्ण भारतात जल्लोषाचं वातावरण आहे.

पाकिस्तान सर्वबाद 147

नाणेफेक जिंकत भारताने पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 19.5 षटकांत 147 धावांवर आटोपला. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांनी करिष्मा दाखवत पाकिस्तानी फलंदाजांच्या काठ्या उडवल्या. टी-20 मध्ये नंबर वनचा फलंदाज असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भुवनेश्वरने अवघ्या 10 धावांत ड्रेसिंग रूममध्ये पाठवले.

भारताची डगमगती सुरुवात

20 षटकांत 148 धावांचे आव्हान पार करण्यासाठी आलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर के एल राहुल हा पहिल्याच चेंडूत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीच्या आक्रमक आणि कर्णधार रोहित शर्माच्या सावध खेळीने भारताचा डाव सावरला. पण हे दोघेही एकामागोमाग एक बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव पुन्हा सावरला.

पांड्या-जडेजाचा झंझावात

14.2 षटकांत 3 बाद 89 अशी स्थिती असतानाच सुर्यकुमार यादव बाद झाला आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या मैदानात उतरला. भारताला एका मोठ्या भागिदारीची गरज असताना पांड्या आणि जडेजा या जोडीने झंझावाती खेळी करत 34 चेंडूंत 52 धावा ठोकल्या आणि भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले.

आक्रमक पांड्या

मोहम्मद नवाज या फिरकी गोलंदाजाच्या शेवटच्या षटकात 7 धावा हव्या असताना पहिल्या चेंडूवर जडेजा बाद झाला. नंतर आलेल्या दिनेश कार्तिकने एक धाव काढत पांड्याला स्ट्राएक दिली. विजयासाठी 6 धावांची गरज असताना, सुरवातीपासून आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिकने नवाजच्या चौथ्या चेंडूवर सणसणीत षटकार हाणत शेवटचा वार केला आणि नवाजसह तमाम पाकड्यांचा आवाज बंद केला.

पांड्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.