ऋजुता लुकतुके
सुपर ४ चा पाकिस्तान विरुद्धचा सामना दोन दिवस चालला. (Asia Cup 2023) त्यानंतर लगेचच १२ सप्टेंबरला भारताचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध होता. त्यामुळे सलग तीन दिवस भारतीय संघ क्रिकेट खेळला. पण, सुदैवाने या दोन्ही सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवले.
श्रीलंकेविरुद्ध भारतीय फलंदाजी ढेपाळली. ५०व्या षटकाच २१३ धावांवर सर्व गडी बाद झाले. गोलंदाजांनी चेंडूंमधील विविधता दाखवत लंकन डावही १७१ धावांवर गुंडाळला. भारतीय संघाने ४१ धावांनी विजय साकारला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवरही सलग तिसऱ्या दिवशी सामना होत होता. त्यात पाऊस. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजांना त्रास देणारी ठरली.
आशिया संघाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर भारताने लंकन संघाची १३ सामन्यांची विजयी मालिकाही खंडित केली.
𝗧𝗵𝗿𝗼𝘂𝗴𝗵 𝘁𝗼 𝘁𝗵𝗲 𝗙𝗶𝗻𝗮𝗹! 🙌
Well done #TeamIndia 👏👏#AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/amuukhHziJ
— BCCI (@BCCI) September 12, 2023
आदल्याच दिवशी पाकिस्तान विरुद्ध ३५६ धावांचा डोंगर उभा करणारी भारतीय फलंदाजांची फळी लंकन फिरकी गोलंदाजांविरुद्ध मात्र ढेपाळली. ५०व्या षटकातच २१३ धावांमध्ये भारतीय डाव संपलाही. विशेष म्हणजे भारताचे सर्वच्या सर्व १० बळी फिरकी गोलंदाजांना दिले. फिरकी गोलंदाजांनी डावातील दहा बळी टिपण्याची ही एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलीच वेळ आहे. (Asia Cup 2023)
लंकन युवा गोलंदाज दुनिथ वेलालागेनं ४० धावांमध्ये ५ बळी मिळवले. यात रोहीत शर्मा, विराट कोहली, के एल राहुल अशा कसलेल्या फलंदाजांचाही समावेश होता, तर वेलालागेचा साथीदार असालंकानेही चार बळी मिळवले. या फिरकी गोलंदाजांची कामगिरी बघता भारतीय संघाची तीन तेज गोलंदाज घेऊन खेळण्याची रणनीती अंगाशी येणार असंच सुरूवातीला वाटत होतं. भारतीय गोलंदाजीत विविधता होती. कुलदीप यादवने आपल्या फिरकीची करामत दाखवल्यावर लंका एकदाही भारतीय आव्हानाच्या जवळपास पोहोचली नाही. ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले. लंकन डाव १७२ षटकांत आटोपला.
वेलालागेनं सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर त्या खालोखाल धनंजय डिसिल्वाने ४१. कुलदीप यादवने ४३ षटकांत ४ बळी मिळवले. तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (Asia Cup 2023)
Consecutive wins in Colombo for #TeamIndia 🙌
Kuldeep Yadav wraps things up in style as India complete a 41-run victory over Sri Lanka 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/P0ylBAiETu#AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/HUVtGvRpnG
— BCCI (@BCCI) September 12, 2023
भारतीय संघासाठी रोहीत शर्मा आणि शुभमन गिल यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी संघाला करून दिली ही संधासाठी एक जमेची बाजू. रोहीत शर्माने सलग दुसरं अर्धशतक करताना ५३ धावा केल्या. तर शुभमन १९ धावांवर बाद झाला. पण, दोघांनी ८० धावांची सलामी दिली.
त्यानंतर वेलालागेनं भारताच्या आघाडीच्या फळीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं. रोहीत, शुभमन आणि पाठोपाठ विराट कोहली (३) असे तीन गडी एका मागोमाग बाद झाले. के एल राहुल (३३) आणि इशान किशनने (३१) अर्धशतकी भागिदारी करत भारतीय डाव सावरला म्हणून भारतीय संघाला दोनशेचा टप्पा ओलांडता आला. बाकी हार्दिक पांड्या, रवी जाडेजा यांनी निराशाच केली.
भारताची गोलंदाजी सुरू झाल्यानंतर मात्र पहिल्यापासूनच डावावर भारताची पकड मजबूत झाली. जसप्रीत बुमरा आणि महम्मद सिराज या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये तीन लंकन बळी मिळवले. आणि त्यानंतरही कुलदीप यादवने मधली फळी कापण्याचं काम सुरूच ठेवलं. अनपेक्षितपणे वेलालागे आणि डिसिल्वा यांनी सातव्या गड्यासाठी ६२ धावांची भागिदारी करून सामन्या थोडीफार जान आणली. पण, जाडेजाने डिसिल्वाला ४१ धावांवर बाद केल्यावर लंकन शेपूट गुंडाळणं भारतासाठी कठीण गेलं नाही.
सामना भारताने जिंकला असला तरी वेलालागेला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहीत शर्माने फलंदाजांची हाराकिरी मान्य केली. तर के एल राहुलने सलग तीन दिवस क्रिकेट खेळण्याचा ताण फलंदाजांना जाणवल्याचं मत व्यक्त केलं. (Asia Cup 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community