पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी तयार केलेले नवे ‘हायब्रिड मॉडेल’ भारतासह सर्वच देशांनी मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. नव्या प्रस्तावानुसार या स्पर्धेतील लढती पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहेत. पाकने वर्ल्ड कप लढतीसाठी भारतात येण्यास मंजुरी दिल्यामुळे भारताने नव्या ‘हायब्रिड मॉडेल’ला मान्यता दिली असल्याचे समजते. ही स्पर्धा १ ते १७ सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे.
नव्या प्रस्तावानुसार पाकिस्तानात स्पर्धेतील किमान चार आणि जास्तीत जास्त पाच लढती होतील. भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्यास विजेतेपदाची लढत श्रीलंकेत होईल; अन्यथा निर्णायक लढत पाकिस्तानात होणार आहे. ‘या स्पर्धेतील पाकिस्तानातील लढती सर्वांत सुरक्षित मानल्या जात असलेल्या लाहोरमध्येच होतील, अशी ग्वाही पाकिस्तान बोर्डाने दिल्याचे समजते. या नव्या स्वरूपानुसार स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा Muslim : बंगळुरूमध्ये ‘शरीफ’ बनला बेशरम; परदेशी नागरीकाचा केला छळ)
भारताने पाकिस्तानात आशिया कप घेण्यासच विरोध केल्यामुळे पाकिस्तान आक्रमक झाले होते. त्यांनी वर्ल्ड कपबाबत बहिष्काराचा विचार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाक बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वर्ल्ड कपमधील पाकचा सहभाग निश्चित केला. मात्र, त्याच वेळी पाकने त्यामोबदल्यात आशिया कपमधील काही लढती पाकिस्तानात घेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मान्यता मिळवण्याची अट घातली होती. बीसीसीआयने आयसीसीची मध्यस्थी मान्य केली असल्याचे समजते.
पाकिस्तानने सुरुवातीस ‘हायब्रीड मॉडेल’ सादर करताना संयुक्त अरब अमिरातीस सहयजमान केले होते. मात्र, तेथील कडक उन्हाचा त्रास होईल, अशी भूमिका श्रीलंका आणि बांगलादेशने घेतली. या परिस्थितीत संपूर्ण स्पर्धेचे संयोजन करण्याची तयारी श्रीलंकेने दाखवली. त्यास बांगलादेश आणि भारताचीही साथ लाभली. मात्र, पाकिस्तानने आता श्रीलंकेस सहयजमान होण्यास तयार केले आहे.
Join Our WhatsApp Community