- ऋजुता लुकतुके
भारताने अपेक्षेप्रमाणे कबड्डीत सुवर्ण पदक जिंकलं खरं. पण, एका विचित्र नियमामुळे खेळात तब्बल एक तास व्यत्यय आला होता. अखेर कौल भारताच्या बाजूने लागला आणि भारताने सुवर्ण जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचा कबड्डी अंतिम सामना अनेक अर्थांनी रोमहर्षक होता. एकतर या खेळातील अव्वल संघ असलेल्या भारताला इराणच्या संघाने जोरदार टक्कर दिली. पहिल्या दहा मिनिटांत त्यांनी आघाडीही घेतली होती आणि त्यानंतर सामना संपायला फक्त एक मिनिट बाकी असताना आणि गुणफलक २८-२८ असा असताना आला तो वादग्रस्त क्षण. (Asian Games 2023)
शेवटच्या एका मिनिटांत नेमकं काय झालं?
समसमान गुण होते आणि भारतीय कर्णधार पवन सेहरावत चढाईसाठी गेला. भारतासाठी ही करो या मरोची चढाई होती, म्हणजे इथं पवन हात हलवत आला असता तर भारताने एक गुण गमावला असता आणि इराणला आयती आघाडी मिळाली असती. सामन्याचं फक्त दीड मिनिट बाकी होतं.
त्यामुळे पवनने डाव्या बगलेतून निर्णायक चढाई केली. पण, खेळाडूला हा लावण्याच्या नादात त्याचा झोक गेला आणि तो लॉबीत पडला. तो लॉबीत असताना इराणच्या चार खेळाडूंनी त्याला मैदानाबाहेर ढकलून देण्याचा म्हणजेच बाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांत ते ही मैदानाबाहेर गेले. (Asian Games 2023)
आणि त्यानंतर नियमाचा सगळा घोळ सुरू झाला. आधी पंचांनी दोन्ही संघांना एकेक गुण दिला. कारण, चढाई करणारा स्वत:च झोक जाऊन पडला असेल तर तांत्रिक दृष्ट्या तो बाद ठरत नाही (लॉबीत गेला असेल तर). उलट तो लॉबीत असताना बचावपटूंनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तेच बाद होतात. इथं पवन मैदानाबाहेर गेला आणि त्याला एका इराणच्या खेळाडूने ढकललं म्हणून दोघेही बाद दिले गेले. (Asian Games 2023)
यावर वरील नियमाचा आधार घेत भारताने अपील केलं. म्हणजे तिसऱ्या पंचांची मदत मागितली. तिसऱ्या पंचांनी रेकॉर्डिंग पाहून आधी १५-२० मिनिटं खल केला. आणि शेवटी भारताचा एक आणि इराणच्या चौघा खेळाडूंना बाद दिलं. यावर इराणच्या खेळाडूंनी मैदानावरच राग व्यक्त केला. आणि गंमत म्हणजे पंच पुन्हा एकदा बावचळले आणि त्यांनी आपला रिव्ह्यू घेऊन दिलेला निर्णय बदलला. हे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खालच्या कोर्टाने पुन्हा एकदा बदलण्यासारखं झालं. (Asian Games 2023)
Sorry to say, but its embarrassing.
Need to accept the final verdict, whatever it may be.
Win or Lose | Do it with dignity— India_AllSports (@India_AllSports) October 7, 2023
यावेळी पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही संघांना १-१ गुण दिला. पण, आता भारतीय संघ ऐकणार नव्हता. आधी संघाचे प्रशिक्षक भास्करन आणि कर्णधार पवन सेहरावत त्यांनी पंचांशी वाद घातला. आणि त्यानंतर पंच ऐकत नाही म्हटल्यावर मैदानातच ठाण मांडलं. भारतीय खेळाडू सामन्यासाठी तयार होईनात. (Asian Games 2023)
हा अख्खा प्रकार ६० मिनिटं चालला. आणि यात उठून दिसला तो सामन्यात रेफरीची भूमिका बजावणाऱ्या चार आंतरराष्ट्रीय पंचांनी घातलेला गोंधळ. आंतरराष्ट्रीय कबड्डीत खेळाडू तोल जाऊन पडला आण लॉबीत असेल तर त्यासाठी अलीकडच्या दिवसांत दोन नियम लागू होते. एक वर सांगितलेला नियम. आणि दुसरा म्हणजे, चढाई करणारा खेळाडू ज्या क्षणी तोल जाऊन लॉबीत जातो, त्याक्षणी चढाई रद्द करणे. यातील दुसरा नियम प्रो कबड्डी लीग दरम्यान बनला आहे.
पण, पंचांनी आशियाई स्पर्धांच्या ठिकाणी नेमका कुठला नियम आहे याची खातरजमा तरी केली नाही, किंवा त्यांना कुठला नियम वापरायचा ते कळलं नाही. त्यामुळे एक तास अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. खेळाडूही हटून बसले. कारण, सुवर्ण पदक पणाला लागलेलं होतं. सामन्याला एकच मिनिटं बाकी असताना भारतासाठी ४ गुण महत्त्वाचे होते. खराब पंचगिरीचं अभूतपूर्व प्रदर्शन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेचा याविषयीचा नियम ग्राह्य धरण्यात आला आणि भारताला त्या वादग्रस्त चढाईचे ४ गुण मिळाले आणि भारताने सामना ३३-२९ ने जिंकला. (Asian Games 2023)
𝐖𝐇𝐀𝐓 𝐀 𝐌𝐀𝐓𝐂𝐇!!
A dramatic match between India and the defending champions, Iran, ends on our favour.
Our warriors gave a major fightback to end their campaign with the coveted GOLD🥇🌟 making it a double in Kabaddi🤩
It was a spectacular display of strength and… pic.twitter.com/ooLVZRBvb1
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2023
(हेही वाचा – Naxalism : नक्षलवादाविरोधात सरकारचे मोठे पाऊल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा)
पवनचं खमकं नेतृत्व
या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघ अपराजित होता आणि अंतिम फेरीतही भारताच्याच विजयाची अपेक्षा होती. पण, इराणने भारताला तगडी लढत दिली. सामन्यात सुरुवातीला आणि मध्यंतरानंतरही इराणने आघाडीही घेतली होती. त्या प्रत्येक वेळी कर्णधार पवन सेहरावतने संघाला बाहेर काढलं. (Asian Games 2023)
पवन बरोबरच युवा खेळाडू नवीन कुमार आणि अनुभवी राकेश कुमार यांनी संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. आज आवर्जून नाव घ्यावं लागेल ते पवनचं. त्याने केलेल्या चढाईत गोंधळ झाला. आणि त्यानंतर नियमाची नीट माहिती घेऊन त्याने भारताची बाजू शेवटपर्यंत पंचांबरोबर उचलून धरली. शेवटी पंचांना नियमही समजावून सांगितला. आणि भारताला ते महत्त्वाचे ४ गुण मिळवून दिले. खराब पंचगिरीची चर्चा मात्र इथून पुढे होत राहील.
कबड्डीतील या सुवर्णानंतर भारताच्या खात्यात २८ सुवर्ण जमा झाली आहेत. तर महिला आणि पुरुष अशा दोन्ही कबड्डी संघांनी स्पर्धेत सुवर्णावर नाव कोरलं आहे. (Asian Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community