होआंगझाओमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) नेमबाजी प्रकारात १० मीटर एअर रायफलमध्ये भारतीय पुरुष संघाची धुरा होती ती दिव्यांश पनवर, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वरी प्रताप तोमर या तीन युवा खेळाडूंच्या हातात. तिघांनी भारताला नवीन विश्वविक्रमासह सांघिक सुवर्णही जिंकून दिलं.
त्यानंतर तीनही खेळाडू वैयक्तिक प्रकारात खेळणार होते. पात्रता फेरीत तिघांनी पहिल्या आठात स्थान मिळवलं. पण, स्पर्धेचा नवीन नियम असं सांगतो की, एका देशाचे फक्त दोनच खेळाडू अंतिम फेरीत खेळू शकतात. त्यामुळे दिव्यांश, ऐश्वरी आणि रुद्रांक्ष यांच्यामध्येच टायब्रेकर घ्यावा लागला. काही तासांपूर्वी सांघिक सुवर्ण जिंकणारे खेळाडूच अंतिम फेरीतील स्थानासाठी आमने सामने होते.
पण, इथं ऐश्वरी आणि रुद्रांक्ष सरस ठरले
त्यानंतरही गंमत म्हणजे कांस्य पदकासाठी ऐश्वरी आणि महाराष्ट्राचा रुद्रांक्ष आमनेसामने होते. दोघांपैकी पदक कोण जिंकणार हे ठरवणार होती दोघांची शेवटची फैर. इथं रुद्रांक्षने १०.६ गुण कमावलेले होते. त्यानंतर काही क्षणातच ऐश्वरीने आपला नेम धरला. गोळी रायफलीतून सुटली आणि त़्याचे हात हवेत वर गेले. नेमबाजांना गोळी सुटल्या सुटल्या अंदाज येतो नेम कसा साधलाय याचा. आणि ऐश्वरीच्या बाबतीत तेच घडलं. त्याने १०.८ म्हणजे रुद्रांक्षपेक्षा वरचढ नेम साधला होता. आणि तिथेच त्याचं कांस्य पदक निश्चित झालं.
ऐश्वरी प्रताप तोमरने आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) देशासाठी दुहेरी पदक जिंकलं. पण, त्याच वेळी राहून राहून त्याला दूर मध्यप्रदेशातील एका खेड्यात असलेल्या आपल्या वडिलांची आठवण येत होती. दिवस व्यस्त असल्यामुळे तो वडिलांशी थेट बोलू शकला नाही. पण, पत्रकारांशी बोलताना त्याने आपलं मन मोकळं केलं. वडिलांच्या एका निर्णयामुळे आजचा दिवस मी पाहतोय, अशीच त्याची भावना होती.
वडिलांचा कुठल्या निर्णयाने ऐश्वरीचं आयुष्य बदललं?
मध्यप्रदेशात रतनपूर या छोट्या गावाच्याही पुढे एका खे्डयात ऐश्वरीचे वडील शेती करतात. मुलाने शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशीच त्यांची अपेक्षा होती. पण, शाळेत ऐश्वरीला काही फारसे चांगले गुण मिळत नव्हते. अशातच त्याचा दूरचा भाऊ नवदीपने वडिलांकडे एक प्रस्ताप ठेवला ऐश्वरीला नेमबाजी शिकवण्याचा. नवदीप स्वत: मध्यप्रदेश नेमबाजी केंद्रात सराव करत होता.
नवदीपच्या प्रस्तावामुळे ऐश्वरीचे वडील गोंधळात पडले. शिक्षण सोडून नेमबाजीत वेळ घालवायचा. आणि ते जमलं नाही तर, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नवदीपला ऐश्वरीमध्ये नेमबाजीचे गुण दिसत होते. पण, मुलगा व्यावसायिकरीत्या यशस्वी झाला नाही तर, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते.
पण, गरीब वडिलांनी आपल्या मुलाच्या आवडीचा मान राखला. आणि शालेय शिक्षणाचा ध्यास सोडून खेळावर लक्ष केंद्रीत करायची परवानगी मुलाला दिली. त्यांचा हा निर्णय ऐश्वरीला आज क्रांतीकारी वाटतो. कारण, खेळाला सुरुवातही झाली नव्हती. आणि तेव्हा ऐश्वरीला त्यांनी परवानगी दिली. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना वडिलांनी घेतलेला हा निर्णय ऐश्वरीला महत्त्वाचा वाटतो.
आणि म्हणूनच पत्रकारांशी बोलताना ऐश्वरी प्रताप सिंग तोमरने आशियाई खेळांमधील दोन्ही पदकं आपल्या वडिलांना समर्पित केली आहेत. ऐश्वरी सध्या २२ वर्षांचा आहे. १० मीटर एअर रायफलच्या वैयक्तिक प्रकारात त्याने २२८.८ गुणांसह कांस्य पदक जिंकलं. तर चीनच्या लुहान शेंगने २५३.३ गुणांसह सुवर्ण पटकावलं. शेंगने नवीन विश्वविक्रमही केला आहे. कोरियाच्या पार्क हयूनने २५१.३ गुणांच्या कमाईसह रौप्य पटकावलं. भारताचा रुद्रांक्ष पाटील चौथा आला.
Join Our WhatsApp Community