बेरूत, लेबनॉन येथे ६ ते ९ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ५व्या आशियाई कॅडेट तायक्वोंदो (Twakando) स्पर्धेत १४ भारतीय खेळाडूंच्या टीमने कांस्य पदक मिळवले. त्यामधील ५ खेळाडू हे सावरकर तायक्वांदो (Twakando) अकॅडमीचे होते. मार्शल आर्टस् या क्रीडा प्रकारात प्रस्थापित असलेल्या थायलँड देशातील खेळाडूंना अंतिम फेरीत पराभूत करून या खेळाडूंनी भारतासाठी पदक मिळवले. याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या खेळाडूंचे कौतुक केले. आशियाई स्पर्धेतील पदक ही सुरुवात आहे, ऑलिम्पिक स्पर्धा हे ध्येय ठेवा, असे आवाहन रणजित सावरकर यांनी यावेळी केले.
५व्या आशियाई कॅडेट तायक्वोंदो (Twakando) स्पर्धेत अंतिम फेरीतील अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने थायलँडचा पराभव करून कांस्य पदक पटकावले. या यशाने तायक्वोंदो फ्री स्टाइल सांघिक पुम्से या प्रकारात हे भारताचे पहिले पदक ठरले आहे. या स्पर्धेत सावरकर तायक्वांदो (Twakando) अकॅडमीचे श्रावणी तेली, अक्षरा शानभाग, किआन देसाई, रुद्र खंदारे आणि काव्य धोडाययानॉर हे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. हे सगळे ५ खेळाडू ब्लॅकबेल्ट आहेत.
सावरकर तायक्वोंदो अकॅडमीतील ५ खेळाडूंचा बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या खेळाडूंच्या पालकांची उपस्थिती विशेष ठरली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ता श्वेता परुळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर, सावरकर तायक्वोंदो अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक राजेश खिलारी, सावरकर स्मारकातील विविध क्रीडा क्षेत्रातील प्रमुख प्रशिक्षक, सावरकर तायक्वोंदो अकॅडमीतील आजी-माजी खेळाडू आदी उपस्थित होते. यावेळी सत्कार झालेल्या पाचही खेळाडूंनी त्यांचा आशियाई स्पर्धेपर्यंतचा प्रवास कसा होता, हे सांगितले. या स्पर्धेसाठी जात असताना या खेळाडूंनी प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात, रेल्वे स्थानकाच्या फलाटावर, हॉटेलातही सराव केल्याचे सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सावरकर क्लबचे ५ खेळाडू येणे हा रेकॉर्ड
या स्पर्धेतील खेळाडूंनी रेल्वे डबा, रेल्वे स्थानकाच्या फलाटावरही सराव केला. खेळात वेडे व्हायचे असते तरच यश मिळते. या खेळाडूंना त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याशिवाय यश मिळणे शक्य नाही. तुमच्याकडे रोल मॉडेल आहेत. या खेळाडूंनी मार्शल आर्ट्समध्ये प्रस्थापित देशांतील खेळाडूंना पराभूत केले, आता तुम्हाला वर्ल्ड चॅंपियन बनायचे आहे. देशाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एका क्लबचे ५ खेळाडू सहभागी होणे हा रेकॉर्ड आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community