ऋजुता लुकतुके
चेन्नईच्या राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या आशियाई हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० असा पराभव केला. या विजयामुळे साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला. त्यानंतर आता उपान्त्य फेरीत भारताचा मुकाबला जपानशी होणार आहे.
The Men in Blue march into the Semi Finals of the Hero Asian Champions Trophy Chennai 2023 undefeated.#HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 pic.twitter.com/30JNbIohdb
— Hockey India (@TheHockeyIndia) August 9, 2023
पाकिस्तानविरोधचा सामना सुरू झाला तो प्रेक्षकांच्या जल्लोषात. भारत – पाक सामन्याची जी उत्कंठा असते ती या सामन्यातही होती. दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांनी मैदान हाऊसफुल्ल केलं होतं. पण, पहिल्या ९५ सेकंदातच पाकिस्तानने पहिली चाल रचली. हन्नान शाहीनने गोलजाळ्यापाशी धडक देऊन गोलही केला. राधाकृष्णन स्टेडिअमवर तेव्हा एकच सन्नाटा पसरला होता.
पण, व्हीडिओ रेफरलमध्ये हा गोल तांत्रिक दृष्ट्या सदोष असल्याचं सिद्ध झालं. भारतीय संघ थोडक्यात बचावले. या सुरुवातीच्या धक्क्यातून भारतीय संघाला उलट बळ मिळालं. कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नंतर एकामागून एक चढाया रचल्या. पहिलं यश पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतनेच केला.
सामन्याच्या २३ व्या मिनिटाला हरमनप्रीतनेच दुसरा गोल केला. तर जुगराज सिंगचा तिसरा गोल झाल्यावर पाकिस्तानने जवळ जवळ आपला पराभव मान्य केला. पुढे मनदीप सिंगने संघासाठी चौथा गोल केला आणि भारताने ४-० असा विजय साकारला.
(हेही वाचा – Caste Wise Census : राजस्थानमध्ये जातनिहाय जनगणना करणार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा)
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा हा १७९ वा सामना होता. आकडेवारीत पाकिस्तान ८२ विजयांसह आघाडीवर असला. तरी अलीकडच्या काळात भारताने पाकविरुद्ध सलग अकरा सामने जिंकले आहेत. सरसकट आकडेवारीत भारताच्या नावावर ६५ विजय आहेत. तर ३२ सामने बरोबरीत सुटले आहेत.
भारतीय संघाच्या या विजयानंतर संघाचे प्रशिक्षक क्रेग फलटन संघावर खुश होते. ‘सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे हा विजय साकार झाला,’ असं फलटन सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना शुक्रवारी (११ ऑगस्ट) जपानशी होणार आहे. स्पर्धेत भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत संघाने सर्वाधिक २० गोल केले आहेत. पण, जपानबरोबरचा साखळी सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे भारताला उपांत्य सामन्यात काळजीपूर्वक खेळ करायला हवा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community