Asian Para Games 2023 : दुसऱ्या दिवशीही भारताची पदकांची लूट, ४ सुवर्णांसह एकूण १८ पदकं खिशात

दसऱ्याच्या दिवशी भारतीय पॅरा ॲथलीटनी पदकांची लयलूट सुरूच ठेवली. आणि ४ सुवर्णांसह आणखी १८ पदकं भारताच्या खात्यात जमा झाली. कुठल्या खेळात कोण चमकलं ते पाहूया

118
Asian Para Games 2023 : दुसऱ्या दिवशीही भारताची पदकांची लूट, ४ सुवर्णांसह एकूण १८ पदकं खिशात
Asian Para Games 2023 : दुसऱ्या दिवशीही भारताची पदकांची लूट, ४ सुवर्णांसह एकूण १८ पदकं खिशात

ऋजुता लुकतुके

होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई पॅरालिम्पिक (Asian Para Games 2023) खेळांमध्ये दुसऱ्या दिवशीही भारतीयांनी पदकांची लूट सुरू ठेवली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आशियाई खेळांत भारतीयांनी १०७ पदकं जिंकली होती. त्यामुळे पॅरा ॲथलीटनीही शंभरी गाठण्याचंच उद्दिष्ट ठेवलं आहे. पहिल्या दिवशी ६ सुवर्णांसह एकूण १९ पदकं भारतीयांनी पटकावली होती. आणि भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता.

मंगळवारी दुसऱ्या दिवशी भारतीयांनी यात आणखी ६ सुवर्णांची भर टाकली आहे. दिवसाच्या सुरुवातीला कॅनोइंगमध्ये प्राची यादवने भारताला पहिलं सुवर्ण जिंकून दिलं. सोमवारी महिलांच्या व्हीएल २ प्रकारातही प्राचीने रौप्य जिंकलं होतं. आता केएल२ प्रकारात प्राचीने सुवर्ण आपल्या नावावर केलं. जवळ जवळ ५४ सेकंदात शर्यत पूर्ण करून प्राचीने सुवर्ण आपल्या नावावर केलं.

प्राची पाठोपाठ महिलांच्या ४०० मीटर टी२० धावण्याच्या स्पर्धेत दीप्ती जीवनजीने सुवर्ण जिंकलं ते नवा आशियाई विक्रम रचत. तिने हे अंतर ५६.६९ सेकंदात पूर्ण केलं. दिप्ती रौप्य जिंकलेल्या पॅरा ॲथलीटपेक्षा २ सेकंदांनी पुढे होती.

भारताला तिसरं सुवर्ण मिळालं ते पुरुषांच्या १००० मीटर टी१३ प्रकारात. शंकरप्पा शरथने २०:१८:९० अशी वेळ नोंदवत ही शर्यत पूर्ण केली. शंकरप्पाची ही पहिली आशियाई स्पर्धा होती. आणि त्याने आत्मविश्वासपूर्ण खेळ करत सुवर्ण आपल्या नावावर केलं.

थाळीफेक स्पर्धेत तर भारताला तीनही पदकं मिळाली. त्यामुळे पोडिअमवर तीनही भारतीय खेळाडू पाहण्याचं भाग्य भारतीय पथकाला या स्पर्धेत तब्बल तिसऱ्यांदा लाभलं. (Asian Para Games 2023) नीरज यादवने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना सुवर्णही मिळवलं. तर योगेश कठुनियाला रौप्य आणि मुथुराजाला कांस्य पदक मिळालं.

मंगळवारी भारताने ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ८ कांस्य पदकं जिंकली. एकूण ३५ पदकांसह भारतीय पथक पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. चीन पहिल्या, इराण दुसऱ्या तर उझबेकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.