-
ऋजुता लुकतुके
जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. ग्रीको – रोमन प्रकारात भारताच्या नितेश कुमारने देशासाठी दुसलं कांस्य जिंकलं. २२ वर्षीय नितेशने कांस्य पदकाच्या लढतीत तुर्कमेनिस्तानच्या अमनबर्दी अगामामेदोवचा ९-० असा निर्विवाद पराभव केला. या सामन्यात नितेशने प्रतिस्पर्ध्याला चितपट केलं. अखेर अमामोमादोवला सामना सोडावा लागला. (Asian Wrestling Championship)
(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये तणाव! लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नाराज)
या स्पर्धेत सुरुवातीपासूनच नितेश फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या फेरीतही कझाकिस्तानचा प्रतिस्पर्धी अलियास गुचिगोवचा ९-० असा पराभव केला होता. पण, त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत मात्र इराणच्या महम्मदानी सरावीकडून त्याचा पराभव झाला. हा सामना नितेशने थोडक्यात गमावला. तांत्रिक बाबतीत त्याचा प्रतिस्पर्धी त्याच्यावर सरस ठरला. पुन्हा एकदा कांस्य पदकाच्या लढतीत वर्चस्व प्रस्थापित करत नितेशने कांस्य जिंकलं. (Asian Wrestling Championship)
(हेही वाचा – IPL 2025 : के. एल. राहुल दिल्ली संघात परतला; पहिल्या सामन्यात घेतली होती पितृत्वाची रजा)
गुरुवारी भारताच्या सुनील कुमारने ८७ किलो वजनी गटांत भारतासाठी पहिलं कांस्य जिंकलं होतं. ग्रीको – रोमन प्रकारात भारताने आशियाई स्तरावर एकूण २ पदकं यंदा जिंकली आहेत. तर नितीन आणि सागर ठाकरन या इतर दोन मल्लांचा मात्र सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच पराभव झाला. ‘ग्रीको – रोमन प्रकारात भारतीय मल्लांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. कुस्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी चांगली होत आहे. आतापर्यंत मिळवलेली दोन पदकं ही त्याचीच साक्ष आहे,’ असं कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग यांनी म्हटलं आहे. आता महिलांची स्पर्धा सुरू होत असून भारताच्या अंतिम पनघल, नेहा, मुसकान, मोनिका, ज्योती लाथर, ज्योती बरवाल आणि लिथिका या महिला कुस्तीपटू आपलं नशीब आजमावणार आहेत. (Asian Wrestling Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community