-
ऋजुता लुकतुके
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी पहिल्याच दिवशी ३ पदकांची लयलूट केली. यात २३ वर्षांखालील विश्वविजेती रितिका हूडाने रौप्य पटकावलं. खरंतर अंतिम सामन्यात रितिका प्रतिस्पर्धी ऐपेरी मेदत किझीविरुद्ध ६-२ अशी आघाडीवर होती. त्यामुळे खरंतर ती सुवर्णाची दावेदार होती. पण, नेमके शेवटच्या १० सेकंदांत तिने ४ गुण गमावले आणि त्याचा फटका तिला बसला. अखेर ७६ किलो गटात तिला रौप्यावर समाधान मानावं लागलं. (Asian Wrestling Championship)
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही याच कझाक प्रतिस्पर्ध्याने रितिकाला उपउपांत्य फेरीत हरवलं होतं. पण, या एका पराभवाव्यतिरिक्त रितिकाही कामगिरी दमदार झाली. उपउपांत्य फेरीत रितिकाने दक्षिण कोरियाच्या सेयेंग जियांगविरुद्ध ३-० तर उपांत्य फेरीत जपानच्या नोदोका यामामोटोचा १०-० असा दणदणीत पराभव केला होता. यामामोटोला तर तिने चितपट केलं. (Asian Wrestling Championship)
(हेही वाचा – Jammu and Kashmir च्या कठुआमध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार, ४ जवान हुतात्मा)
रितिकाच्या सुरुवातीनंतर मुस्कान आणि मानसी लाथर यांनी आपापल्या वजनी गटांत भारताला आणखी दोन पदकं जिंकून दिली. ६८ किलो वजनी गटांत मानसीला मिळालेलं हे पहिलं वरिष्ठ गटांतील आंतरराष्ट्रीय पदक आहे. तिने कझाकिस्तानच्या इरिना काझयुलिनाचा १२-२ असा पराभव केला. तांत्रिकदृष्ट्या मानसी सरस ठरली. आधीच्या उपउपांत्य फेरीच्या लढतीत मानसीला प्रतिस्पर्धी एमी इशीने पुढेचाल दिली होती. एमी सामन्यापूर्वी आजारी पडल्यामुळे खेळू शकली नाही. मानसीही १७ वर्षांखालील जागतिक जगज्जेती आहे. सध्या वरिष्ठ गटात खेळायला तिने सुरुवात केली आहे. (Asian Wrestling Championship)
५९ किलो वजनी गटांत मुस्कानचा खेळ संमिश्र झाला. पात्रता फेरीत चांगला खेळ करून ती मुख्य स्पर्धेत आली. पण, उपउपांत्य फेरीत जपानच्या साकुरा ओनिशीने तिचा पराभव केला. त्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीतही मंगोलियाच्या अल्टजिन तोगतोखने तिला कडवी झुंज दिली. पण, अखेर मुस्कानचा ४-० असा विजय झाला. त्यापूर्वी पुरुष गटांत ग्रीको – रोमन प्रकारात भारतीय पुरुषांनी २ कांस्य जिंकली होती. सुनील कुमारने ८७ तर नितेश कुमारने ७६ किलो वजनी गटांत कांस्य जिंकलं. त्यामुळे आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पथकाने आतापर्यंत १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे. (Asian Wrestling Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community