…आणि कर्णधारपद सोडण्याआधी आलेली ‘ती’ ऑफर विराटने धूडकावून लावली!

202

टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी मालिकेतील कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा त्याने रविवारी ट्विट करुन दिली. त्यातच आता एक बातमी समोर येत आहे की, कसोटी कर्णधारपद सोडण्याआधी त्याला बीसीसीआय अधिका-याकडून एक ऑफर देण्यात आली होती, मात्र विराटने ही ऑफर धूडकावून लावली आहे.

विराटने दिला नकार

बंगळूरू येथे खेळला जाणारा कसोटी सामना विराटचा शंभरावा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने शुक्रवारी फोन करुन कोहलीला कसोटी मालिकेचे कर्णधारपद बंगळूरला होणा-या शंभराव्या कसोटीनंतर सोडण्याचे सूचवले, त्यानंतर जल्लोषात कसोटी कर्णधारपद सोडण्याचे सांगितले, मात्र विराटने ही ऑफर धुडकावून लावली. एका सामन्याने काही फरक पडत नाही. एका सामन्यासाठी थांबून उत्सवात कर्णधारपद सोडण्याचा माझा विचार नाही, मी तसा नाहीये असं विराटने संबंधित अधिका-याला सांगितले.

सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार

विराटच्या नेतृत्वात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे, पण या यशस्वी कर्णधाराने त्याचा अत्यंत यशस्वी काळ पराभवाने संपवला. नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरच कोहलीने कर्णधारपदाला रामराम ठोकला आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीने 90 सामने खेळल्‍यानंतर 2014 च्‍या मेलबर्न कसोटीमध्‍ये अनिर्णित राहिल्‍यानंतर, कसोटी कर्णधारपद सोडून करिअरचा अंत केला होता.

( हेही वाचा :अमरावतीत तणाव! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला )

विराट कोहलीचं ट्विट

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची माहिती ट्वीट करत दिली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये विराट कोहलीने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यासोबत आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे.  विराट कोहली म्हणतो,  ‘ मागील सात वर्षांपासून भारतीय संघाला योग्य दिशेला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझी जबाबदारी इमानदारीने पूर्ण केली आहे.” मला इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो, असेही कोहलीने म्हटलयं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.