माजी क्रिकेटपटूला श्रद्धांजली देत शेन वॉर्ननं घेतला जगाचा ‘निरोप’

त्याचं हे अचानक जाणं क्रिकेटप्रेमींना चटका लावणारं आहे.

130

फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्न याचं वयाच्या 52व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं शेन वॉर्नचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील या दिग्गज फिरकीपटूने अचानक घेतलेली ही एक्झिट क्रीडाविश्वाला हादरवून सोडणारी आहे.

विशेष म्हणजे शेन वॉर्नने शुक्रवारी सकाळीच आपल्या ट्विटर हँडलवरुन माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रोड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यामुळे त्याचं हे अचानक जाणं क्रिकेटप्रेमींना चटका लावणारं आहे.

मार्श यांना वाहिली होती श्रद्धांजली

शेन वॉर्नने 4 मार्च रोजी सकाळी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रोड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. मार्श यांच्या जाण्याची बातमी ऐकून दुःख झाले. ते एक महान खेळाडू होते. त्यांनी अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. रॉड यांना क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंसाठी ते कायमंच आदर्श होते. असं ट्वीट करत शेन वॉर्नने मार्श यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं होतं.

वॉर्नची क्रिकेट कारकीर्द

जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत त्याने अनेक खेळाडूंना आपल्या गुगलीने त्रस्त केले. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळणा-या वॉर्नने क्रिकेट जगतातील दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीने त्रस्त केले. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांत 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यांत 293 गड्यांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. याशिवाय 55 आयपीएल सामन्यांत वॉर्नने 57 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक प्रकारात आपली छाप सोडली आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालीच राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल चषक जिंकला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.