-
ऋजुता लुकतुके
प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत यंदा पाकिस्तानचा संघ दिसणार नाही. यजमान मलेशियाने त्यासाठी कारण दिलं आहे ते आधीच्या हंगामातील कर्जाची परतफेड न झाल्याचं. त्यामुळे आर्थिक निकषांवर पाकिस्तानवर ही नवीन नामुष्की ओढवली आहे. ‘पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या माजी अधिकाऱ्याने काही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे पाकिस्तान हॉकीवर कर्ज झालं. आणि आता संघालाच स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे,’ असं पाक हॉकीतील सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (Azlan Shah Hockey)
गेल्यावर्षी पाकिस्तानी संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला होता. तरीही यंदा त्यांना यजमान मलेशियाकडून बोलावणं आलेलं नाही. ‘सध्या मलेशियन हॉकी संघटनेतील अधिकारी पाकवर नाराज आहेत. पण, त्यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे,’ असंही या सूत्रांनी म्हटलं आहे. अझलन शाह स्पर्धा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात भरते. आणि ही आमंत्रितांची स्पर्धा आहे. भारतीय संघही यात दरवर्षी भाग घेतो. (Azlan Shah Hockey)
(हेही वाचा – Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी)
मार्च महिन्यापर्यंत स्पर्धेचं आमंत्र आशियातील आघाडीच्या हॉकी संघांना पाठवलं जातं. यंदा पाकिस्तानला हे आमंत्रण गेलं नसलं तरी कर्जाची परतफेड आणि गैरसमज दूर झाल्यानंतर हे आमंत्रण आठवड्या भरात मिळू शकेल असा विश्वास पाकिस्तान हॉकी संघटनेला वाटतोय. ‘पाकिस्तान आणि मलेशिया या देशांमधील संबंध कित्येक वर्षं खूप चांगले राहिले आहेत. त्यामुळे हा आर्थिक मुद्दाही येत्या दिवसांमध्ये निकालात निघू शकेल. आणि पाकिस्तानचा संघही स्पर्धेत सहभागी होईल,’ असा विश्वास पाकिस्तानने व्यक्त केला आहे. (Azlan Shah Hockey)
दरम्यान गतविजेता जपानचा संघही यंदा या स्पर्धेत खेळणार नाहीए. राष्ट्रीय संघ इतर स्पर्धेत व्यस्त असल्यामुळे या स्पर्धेला ते मुकणार आहेत. सुलतान अझलन शाह चषक ही हॉकीतील एक मानाची स्पर्धा आहे. १९८३ पासून मलेशियात अझलन शाह हॉकी मैदानातच या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियन खंडातील देश यात सहभागी होतात. ४२ वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर भारताने ५ आणि पाकिस्तानने ३ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यंदा स्पर्धेत बेल्जिअम, आयर्लंड, जर्मनी, कॅनडा, भारत आणि मलेशिया हे देश सहभागी होणार आहेत. (Azlan Shah Hockey)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community