-
ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) भारतीय कुस्ती फेढरेशनकडून राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी आलेलं निमंत्रण अस्वीकार केलं आहे. आणि इतर खेळाडूंनाही त्याने कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धेत खेळू नका असं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर १० मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेवर स्थगिती आणावी अशी याचिका त्याने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
बजरंग बरोबर त्याचे आंदोलनातील साथीदार साक्षी मलिक, तिचा नवरा सत्यव्रत काडियन आणि विनेश फोगाटही आहेत. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी अपेक्षित आह. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि कझाकस्तानमध्ये होणारी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा यासाठी भारतीय संघाची निवड या चाचणी परीक्षेतून होणार आहे.
बजरंग सध्या रशियात सराव करत आहे. पण, तिथून त्याने पीटीआय या वृत्तसंस्थेकडे आपलं म्हणणं मांडलं. ‘मला कुस्ती खेळायचीय म्हणूनच मी रशियातील या सरावावर ३० लाख रुपये खर्च केलेत. पण, जी कुस्ती संघटना केंद्रसरकारने निलंबित केलीय, ती संघटना निवड चाचणी स्पर्धा कशी काय घेऊ शकते? म्हणून या स्पर्धेला आणि तिचे अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांना माझा विरोध आहे. अशा स्पर्धेत मी खेळणार नाही. मी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत,’ असं बजरंग पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो.
(हेही वाचा – Bombay High Court च्या आदेशामुळे निवडणूक कामापासून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटका)
‘We Will Not Go’: Bajrang Punia Calls For Government Interference As WFI Announces National Trials#WFI #BajrangPuniahttps://t.co/Zt4Ph1Ge0g
— Free Press Journal (@fpjindia) February 29, 2024
कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनाही मध्यंतरी जुनं विसरून आगामी निवड चाचणीत खेळण्याचं आवाहन केलं होतं. बजरंग, साक्षी आणि विनेशने अजूनही निवड चाचणी स्पर्धेत सहभागी न होण्याचाच निर्णय घेतलाय.
डिसेंबर महिन्यात भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका झाल्या. पण, त्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग (Sanjay Singh) विजयी झाले. त्यामुळे शरण यांचा विरोध करत नवी दिल्लीत आंदोलन करणारे कुस्तीपटू संजय सिंग (Sanjay Singh) याचाही विरोध करत आहेत. क्रीडा मंत्रालयानेही कुस्ती फेडरेशन निलंबित केली आहे. आणि त्यांच्याजागी तीन सदस्यीय तात्पुरती समिती नेमली आहे.
पण, संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या अध्यक्षतेखालील फेडरेशनला हा निर्णय मान्य नाही. त्यांनी फेडरेशन स्वायत्त आहे असं म्हणत आपला कारभार सुरूच ठेवला आहे. तर अलीकडेच जागतिक संघटनेनंही भारतीय कुस्ती फेडरेशनवरील बंदी हटवून त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय कुस्तीत सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. तात्पुरत्या समितीकडे खरे अधिकार आहेत की, फेडरेशनकडे हेच अजून स्पष्ट नाही. दोन्ही यंत्रणा स्वतंत्र कारभार करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community