पैलवान बजरंग पुनियाने गुरुवारी, १९ जानेवारीला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंहबाबत मोठा दावा केला आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी देशातून पळून जाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर नजर ठेवावे, अशी मागणी बजरंग पुनियाने केली आहे. विनेश फोगाटने आंदोलनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी कुस्ती महासंघावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. शिवाय लैंगिक छळाचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
‘आम्हाला कोणत्याही नेत्याची गरज नाही’
आंदोलनच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बजरंग म्हणाला की, ‘जर आम्ही देशासाठी लढू शकतो, तर स्वतःसाठीही लढू शकतो. आमचा लढा गैर राजकीय आहे. सर्व खेळाडू आमच्यासोबत आहे. आम्ही झुकणार नाही. आम्हाला कोणत्याही नेत्याची गरज नाही. आम्ही स्वतः लढू शकतो.’
सध्या भारतीय पैलवान दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. चॅम्पिअन कुस्तीपटू बबीता फोगाटही आंदोलनात सामील झाली आहे. बबीता फोगाट ट्वीट करून म्हणाली होती की, ‘कुस्तीसंदर्भातील या प्रकरणात मी सर्व खेळाडूंसोबत उभी आहे. मी आश्वासन देते की, हा प्रश्न प्रत्येक स्तरावर सरकारसमोर मांडण्याचे काम मी करणार असून खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन भविष्यातील निर्णय घेतला जाईल.’
(हेही वाचा – भारतीय कुस्तीतही #MeToo; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटू उतरल्या ‘मैदानात’)