Ban vs NZ Test : पहिल्या कसोटीत यजमान बांगलादेशचा न्यूझीलंडवर १५० धावांनी विजय

202

बांगलादेश आणि न्यूझीलंड दरम्यान सिलहेट इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी (Ban vs NZ Test) सामन्यात पाचव्या दिवशी बांगलादेशने न्यूझीलंडचा १५० धावांनी पराभव केला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर किवी फलंदाज दुसऱ्या डावात टिकाव धरू शकले नाहीत. विजयासाठी ३३२ धावांची गरज असताना चौथ्या दिवशी त्यांची अवस्था ७ बाद ११७ अशी बिकट झाली होती.

पण, रात्री नाबाद असलेला डॅरिल मिचेलच्या ५३ धावा आणि कर्णधार टीम साऊदीच्या ३४ धावा यामुळे किवी संघाने पहिलं सत्र खेळून काढलं. पण, खेळपट्टी प्रचंड संथ होती. आणि त्यावर डावखुरा गोलंदाज तैजुल इस्लामला खेळणं किवी फलंदाजांना जड गेलं.

तैजुलने ७५ धावा देत ५ बळी टिपले. तर दोन्ही डावांत मिळून त्याने १० बळी टिपले. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशचा नियमित कर्णधार शकीब अल हसन सह इतरही काही महत्त्वाचे खेळाडू या मालिकेत खेळत नाहीएत. असं असताना पहिल्याच कसोटीत बलाढ्य किवी संघाला मात देत आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेशने दमदार सुरूवात केली आहे.

(Ban vs NZ Test) कसोटी तशी रंजक होती. कारण, पहिल्या डावात न्यूझीलंडने ७ धावांची आघाडी घेतली होती. केन विल्यमसनने तगडं शतक झळकावलं होतं. पण, दुसऱ्या डावात बांगलादेशचा बदली कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या १०५ धावा आणि मुश्फिकुर रहीम तसंच मेहेदी मिराज यांची अर्धशतकं यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ३३८ धावा केल्या. आणि तिथे कसोटीचं पारडं बांगलादेशच्या बाजूने झुकलं.

कारण, चौथ्या डावात विजयासाठी तीनशेच्या वर धावा करणं कठीणच होतं. आणि तेच घडलं. न्यूझीलंडचा दुसरा डाव १८१ धावांत आटोपला. आता दुसरी कसोटी मिरपूरला बुधवारपासून होणार आहे.

(हेही वाचा Ind vs Aus 4th T-20 : रायपूर क्रिकेट स्टेडिअमवर वीजच नाही, जनरेटरवर खेळवला सामना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.