- ऋजुता लुकतुके
शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी भारत आणि विंडिजचे संघ अमेरिकेत फ्लोरिडा राज्यांत मियामी इथं पोहोचले आहेत. सामन्यापूर्वी मिळालेल्या एक दिवसांच्या सुट्टीचा आनंद सध्या खेळाडू घेत आहेत. वेस्ट इंडिजबरोबरच्या टी-२० मालिकेचे शेवटचे दोन सामने अमेरिकेत फ्लोरिडा राज्यात मियामी इथं होणार आहेत. मालिकेत भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी शनिवारी होणारा पहिला सामना जिंकणं भारतीय संघासाठी आवश्यक आहे. पण, विंडिजमध्ये गयानातून संघ लांबचा प्रवास करून मायामीला पोहोचला. त्यामुळे गुरुवारचा दिवस संघाला सरावातून सुट्टी देण्यात आली होती. आणि या सुट्टीचा पुरेपूर उपयोग खेळाडूंनी मायामीला भटकंतीसाठी केलेला दिसतोय.
अनेकांची ही पहिलीच अमेरिका भेट आहे. या मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांत अनुक्रमे ५१ आणि नाबाद ४९ धावा फटकावणारा तिलक वर्माही यात मागे नाहीए. सूर्यकुमार यादव आणि युजवेंद्र चहल यांची पत्नीही या दौऱ्यात त्यांच्याबरोबर आहे. आणि या सगळ्यांबरोबर तिलक वर्माही मायामी ब्रिज आणि इतर ठिकाणी भटकंती करताना दिसतोय. आपल्या भटकंतीचे फोटोही त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर टाकले आहेत. या मालिकेतील चौथा सामना १२ ऑगस्ट रोजी मायामी इथं सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिअम इथं होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी १३ ऑगस्टला पाचवा आणि अंतिम टी-२० सामना त्याच मैदानात होईल. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या सामन्यांना मिळत आहे.
(हेही वाचा – IND vs WI : भारतीय क्रिकेट संघ शेवटच्या दोन सामन्यांसाठी अमेरिकेत पोहोचला तो क्षण)
तिलक वर्माने शेवटच्या दोन सामन्यांत केलेल्या कामगिरीमुळे त्याच्याकडून आशा निर्माण झाल्या आहेत. आगामी आशिया चषक आणि विश्वचषकातही तो शैलीदार डावखुऱ्या फलंदाजाची संघातील उणीव भरून काढू शकतो, असं काहींना वाटतं. तिलकचा एक पाठीराखा आहे त्याच्या संघातील वरिष्ठ खेळाडू आर अश्विन. आपल्या यूट्यूब वाहिनीवर बोलताना अश्विन म्हणतो, ‘तिलकने आपल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता राष्ट्रीय निवड समिती सदस्यांची नजरही त्याच्यावर जावी. आणि भारतीय संघात मधल्या फळीत असलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तिलकचा भारतीय संघासाठीही विचार व्हावा.’ तिलक डावखुरा असला तरी त्याचा खेळ कर्णधार रोहित शर्माशी मिळता जुळता आहे, असंही अश्विनला वाटतं.
२० वर्षीय तिलक वर्मा सध्या नक्कीच चर्चेत आहे. एकतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याने चांगली कामगिरी बजावली होती. त्यानंतर भारतीय संघात मिळालेल्या संधीचंही त्याने सोनं केलं आहे. या मालिकेत १३९ धावांसह तो सगळ्यात यशस्वी भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहीत शर्मानेही अलीकडे युवराज सिंग नंतर त्याच्या तोडीचा क्रमांक चारवर खेळेल असा आणि डावखुरा फलंदाज भारताला मिळाला नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे तिलक वर्माकडे या सगळ्या दृष्टीने आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community