-
ऋजुता लुकतुके
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करायची असेल तर आधी न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवातून बाहेर यायला पाहिजे, असं शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे. आणि दुसरं एवढ्या मोठ्या मालिकेत चांगली सुरुवात महत्त्वाची, असे दोन कानमंत्र त्यांनी दिले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ सध्या बॅकफूटवर आहे. आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीचं आव्हानही त्यामुळे कठीण झालं आहे. अशावेळी शास्त्री यांनी हे दोन सल्ले दिले आहेत.
‘भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धचा पराभव जिव्हारी लागला असणार हे स्वाभाविक आहे. त्या मालिकेत संघाला अतीआत्मविश्वास नडला. पण, एरवी हा भारतीय संघ अव्वलच आहे. त्यांना ऑस्ट्रेलियातही सकारात्मक दृष्टिकोण ठेवून खेळावं लागेल. तर इथंही त्यांना विजय मिळवता येईल. पण, त्यासाठी कुठलीही हयगय चालणार नाही. मालिकेची सुरुवात संघासाठी चांगली व्हावी लागेल. तर पुढे संघाला मार्ग सापडत जाईल,’ असं रवी शास्त्री (Ravi Shastri) आयसीसीच्याच एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला आगामी बोर्डर गावसकर मालिकेतील ५ पैकी ४ कसोटी जिंकणं आवश्यक आहे. तर निर्विवादपणे संघाला अंतिम फेरी गाठता येईल. भारतीय संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका लागोपाठ जिंकल्या आहेत. पण, त्या ३ किंवा ४ कसोटींच्या मालिका होत्या. २०१८ मध्ये ॲडलेडची पहिलीच कसोटी भारतीय संघाने जिंकली होती. चेतेश्वर पुजाराचं त्या कसोटीतील शतक लक्षवेधी ठरलं होतं. (Border – Gavaskar Trophy 2024)
ऑस्ट्रेलियातील आधीच्या मालिका विजयांमधून प्रेरणा घेऊन आताही भारताने चांगली सुरुवात करावी असा रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा संघाला सल्ला आहे. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली आणि २०२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकल्या आहेत. बोर्डर गावसकर चषकही (Border – Gavaskar Trophy 2024) गेली १० वर्षं भारतीय संघाच्या ताब्यात आहे. आता गरज आहे ती न्यूझीलंड विरुद्धचा पराभव विसरून ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करण्याची.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community