-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेतील १-३ अशा पराभवानंतर भारतीय संघासमोर फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कैक समस्या उभ्या राहिल्या आहेत. रोहित आणि विराट आता निवृत्ती पत्करणार का? जसप्रीत बुमराहला साथ देऊ शकेल असा तेज गोलंदाज संघाला कधी मिळणार? आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची ढेपाळलेली कामगिरी कधी सावरणार? असे अनेक प्रश्न पत्रकार आणि लोकांच्या मनात सध्या आहेत. आणि ऑस्ट्रेलियातील मालिकेनंतर खुद्द प्रशिक्षक गौतम गंभीरने या प्रश्नांना परखडपणे उत्तरं दिली आहेत. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy : १० वर्षांनंतर भारताने गमावली बोर्डर – गावसकर मालिका, भारतीय संघाचं प्रशस्तीपत्रक लाल)
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. अंतिम अकरा खेळाडूंचा विचार करून संघात रोहित शर्माला वगळलं. आणि तेव्हापासून पत्रकारांनाही तो स्वत: सामोरं गेला आहे. सिडनीत बदली कर्णधार जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चौथ्या डावांत गोलंदाजी करू शकला नाही. तेव्हाही गंभीरच पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्याने काही थेट प्रश्नांची काय उत्तरं दिली ते पाहूया, (Border – Gavaskar Trophy)
विराट व रोहितचा फॉर्म आणि निवृत्तीवर
रोहित आणि विराट हे संघातील दोन ज्येष्ठ खेळाडू आहेत. आणि त्यांनी कधी निवृत्त व्हायचं किंवा व्हायचं की नाही, हा निर्णय त्या दोघांनी घ्यायचा आहे. असं गंभीर म्हणाला. ‘कुणी निवृत्त व्हावं का, या प्रश्नावर मी उत्तर देऊ शकत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, रोहित आणि विराटकडे बघून मी एवढं नक्की सांगतो. की, त्यांच्याकडे धावांची भूक आहे. ते कणखर खेळाडू आहेत. आणि भारतीय क्रिकेट ते आणखी पुढे नेतील, अशी मला आशा आहे.’ (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघ बाद, ‘या’ दोन संघांमध्ये अंतिम लढत)
रोहितचा स्वत: न खेळण्याचा निर्णय
खेळाडूपेक्षा संघाला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं म्हणत रोहितच्या निर्णयाचं गंभीरने समर्थनच केलं. ‘खेळाडू येतात आणि जातात. पण, संघ आणि देशभावनेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघाच्या कामगिरीला मी आणि प्रत्येकानेच महत्त्व दिलं पाहिजे. आणि रोहितने त्याचंच उदाहरण सिडनीमध्ये घालून दिलं. एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेण्याबद्दल आपण फक्त बोलतो. पण, ते काम वरून सुरू झालं पाहिजे. तेच रोहितने केलं.’ (Border – Gavaskar Trophy)
बुमराहची अनुपस्थिती
या मालिकेत ३२ बळी मिळवून सर्वोत्तम कामगिरी करणारा बुमराह अंतिम कसोटीत चौथ्या डावात गोलंदाजीही करू शकला नाही. भारतीय संघाला हा मोठा धक्का होता. हे पराभवाचं एकमेव कारण नव्हतं, असं गंभीरला वाटतं. ‘बुमराह नव्हता म्हणून आम्ही ही कसोटी हरलो, असं म्हणणं मला चुकीचं वाटतं. तो असता तर बरं झालं असचं हे कुणीही सांगेल. पण, संघात तरीही ५ गोलंदाज होते. आम्हाला विजयाच्या काही संधीही मिळाल्या. आमचा संघ चांगलाच होता. पण, तरीही आम्ही हरलो.’ (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- Shivaji Park : …तर महापालिका कार्यालयासमोर आणून टाकली जाईल लाल माती; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम)
ड्रेसिंग रुममधील वातावरण
या मालिकेतून काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगलंच आहे, असं गंभीरने म्हटलं आहे. ‘या मालिकेत भारतीय संघासाठी चांगल्या गोष्टी घडल्या. खरंतर अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. तरुणांनी आपली कामगिरी उंचावली. यशस्वी, नितिश, आकाश या सगळ्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. वॉशिंग्टननेही फलंदाजीत चमक दाखवली. मला वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं नाही. पण, मोहम्मद सिराजचं लढवय्येपणही उठून दिसलं. बुमराह आणि यशस्वी यांच्यासाठी तर ही ही मालिका चांगलीच गेली. आता देशांतर्गत क्रिकेटला खेळाडूंनी महत्त्व द्यावं. ड्रेसिंग रुम हसरीच आहे.’ (Border – Gavaskar Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community