-
ऋजुता लुकतुके
मेलबर्नमध्ये झालेली बॉक्सिंग डे कसोटी ५ दिवस रंगली. आणि स्पर्धात्मक क्रिकेट पाचही दिवस बघायला मिळालं. पण, शेवटी भारताचा १८४ धावांनी पराभव झाला. या पराभवाचे भारतीय संघावर दूरगामी परिणाम होणार आहेत. कारण, एकतर भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर गेला. आणि दुसरं म्हणजे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही भारताची मोठी पिछेहाट झाली आहे. या पराभवाची मीमांसा करताना माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांना पाचव्या दिवशी रिषभ पंतचा बळी निर्णायक वाटतो. (Border – Gavaskar Trophy)
‘रिषभ पंतचा बळी निर्णायक ठरला. खरंतर भोजनाच्या वेळी ३ बाद ३३ अशी स्थिती असताना भारताने सामना अर्धा गमावलेला होता. पण, पंत आणि यशस्वी जयसवाल यांनी संघाला आवश्यक स्थैर्य दिलं. अख्खं दुसरं सत्र त्यांनी खेळून काढल्यामुळे आशा निर्माण झाली होती. पण, पंतच्या बळीनंतर पारडं पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलं,’ असं शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलून दाखवलं. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- Akkalkot Accident : अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 4 ठार, 7 जखमी)
दुसऱ्या सत्रात पंत आणि यशस्वी यांनी ८८ धावांची भागिदारी करून भारतीय धावसंख्या ३ बाद १२१ वर नेली होती. दोघांचा चांगला जम बसला होता. आणि जोखीम न पत्करता धावाही निघत होत्या. पण, रिषभ पंत कामचलाऊ गोलंदाज ट्रेव्हिस हेडच्या फिरकीवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स (२८/३) आणि नॅथन लायन (२७/२) यांनी उर्वरित भारतीय फळी २२ षटकांत ३३ धावांत गुंडाळली. (Border – Gavaskar Trophy)
या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मालिकेत मोलाची २-१ अशी आघाडी मिळाली आहे. तर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठीही त्यांनी जोरदार दावेदारी केली आहे. उलट भारतीय संघासाठी वर्षाची चांगली सुरुवात होऊनही न्यूझीलंड विरुद्घच्या पराभवाने गोष्टी बिघडल्या. आणि त्यामुळे आता कसोटी अजिंक्यपदाची वाटचालही मंदावली आहे. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; माहिती व तंत्रज्ञान मंत्री Ashish Shelar यांचे निर्देश)
मेलबर्न कसोटीत आघाडीच्या फलंदाजांचं अपयश, बुमराहला दुसऱ्या बाजूने न मिळणारी साथ अशा कितीतरी गोष्टी संघातील त्रुटी दाखवणाऱ्या होत्या. पण, पंत आणि यशस्वी यांचा जम बसलेला असताना तिसरं आणि शेवटचं सत्र त्यांना खेळून काढायचं होतं. पण, ही जोडी फुटल्यावर फलंदाज बाद होत राहिले. आणि एरवी बरोबरीत सुटू शकेल अशी कसोटी भारताने गमावली. आता पाचवी कसोटी ३ जानेवारीपासून सिडनीत होणार आहे. (Border – Gavaskar Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community