धार्मिक कट्टरतेला तिने दिला जोरदार पंच, हिजाब झिडकारुन झाली सुप्रसिद्ध बॉक्सर

133

दंगल या चित्रपटातील ’म्हारी छोरियां छोरों से कम है के…’ हा डायलॉग म्हणजे मागासलेल्या समाजावर मारलेली एक जोरदार चपराक आहे. ही कहाणी फोगाट यांची नाही. ही कहाणी आहे तुर्कीस्थानात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणार्‍या एका भारताच्या मुलीची.

निकहत झरीन या नव्या दमाच्या मुलीने इस्तांबुलमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या ५२ किलो फ्लायवेट कॅटेगरीमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकवून दिलं. थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला फायनलमध्ये हरवून तिने भारताचं नाव मेडलवर कोरलं. वर्ल्ड बॉस्किंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी निकहत ही ५ वी भारतीय महिला ठरली.

निकहतचा जीवन परिचय

निकहत झरीनचा जन्म तेलंगणाच्या निजामाबादमध्ये १४ जून १९९६ रोजी झाला. तिच्या बाबांचं नाव आहे मोहम्मद जमील अहदम आणि आईचं नाव परवीन सुलताना आहे. निकहतला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान बहीण आहे. तिचे बाबा सेल्समनचे काम करायचे आणि आई अर्थातच गृहिणी. महत्वाचं म्हणजे तिचे बाबा मोहम्मद जमील अहमद हे भूतपूर्व फूटबॉलपटू आणि क्रिकेटर होते.

वडिलांनीच म्हटलं तथास्तु

निकहत आज वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे. यामागे तिच्या बाबांचा खूप मोठा हात आहे. निकहत १३ वर्षांची असताना ती आपल्या आई-वडिलांसोबत अर्बन गेम्स पहायला गेली होती, तिने बॉक्सिंगची मॅच पाहिली. मग तिने बाबांना प्रश्न विचारला की, “हा मुलांचाच खेळ आहे का?” बाबांनी गंमत म्हणून तिला उत्तर दिलं, “महिला सुद्धा हा खेळ खेळतात, पण लोकांना कदाचित असं वाटतं की हा खेळ खेळण्यासाठी महिलांमध्ये पुरेशी ताकद नसते.” हे निकहतने ऐकलं आणि तिने ठरवलं, आता जगाला आपली ताकद दाखवायचीच…

निकहतला लहानपणी आयपीएस व्हावसं वाटत होतं. पण वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आयपीएस होण्याचं तिचं स्वप्न आता संपलं होतं. तिला तर आता मुक्केबाज व्हायचं होतं. तिच्या वडिलांनी कधीही तिच्यावर दबाव टाकला नाही. उलट तिला प्रोत्साहनंच दिलं.

डोळ्यांत स्वप्न घेऊन ती निघाली

वडिलांचा आशीर्वाद आणि डोळ्यांत बॉक्सर होण्याचं स्वप्न घेऊन ती निजामाबादहून हैद्राबादला आली. तिथे तिला बॉक्सिंगची ट्रेनिंग घ्यायची होती. मुली नसल्यामुळे तिला मुलांसोबतच कुस्ती लढावी लागली. सुरुवातीला निजामाबादच्या निर्मला ह्रदय गर्ल्स हायस्कूलमध्ये तिने शिक्षण घेतलं. त्यानंतर हैदराबादच्या एवी कॉलेजमध्ये डिग्री घेतली. हैद्राबादेत निकहतचे काका बॉक्सिंग कोच आहेत आणि त्यांचा मुलगा बॉक्सर आहे. तिने आपल्या काकांकडेच बॉक्सिंगचे धडे गिरवले.

धार्मिक कट्टरतेचा दबाव

निकहत मुस्लीम असल्यामुळे तिच्यावर खूप दबाव होता. बोलणारे हजार तोंडांनी बोलतात हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यांना तर बोलायला संधीच हवी असते. मुस्लीम मुलगी शॉर्ट्स घालून जाते हे चालणार नाही. लहान कपडे ती कशी घालू शकते? हिजाब घालायला देखील तिच्यावर दबाव टाकण्यात आला. पण निकहतने या सर्व कट्टरतावादी लोकांकडे दुर्लक्ष केलं आणि गोल्ड मेडल जिंकून तिने सर्वांना जणू एक जोरदार पंच मारला. तिने शाब्दिक लढाया लढण्याऐवजी कर्तृत्व गाजवून दाखवलं.

निकहतचं बॉक्सिंग करिअर

निकहतने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि बॉक्सिंगच्या करिअरला सुरुवात केली. १५ वर्षांच्या निकहतने ज्युनियर मीटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करुन दाखवलं होतं. २०११ मध्ये तुर्कस्थानात महिला ज्युनियर यूथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये फ्लाय वेटमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघ महिला आणि ज्युनियर विश्व चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड पटकावलं आहे. तसेच २०१४ च्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये देखील सुवर्णपदक मिळवलं आहे. निकहतच्या विजयाचा अश्वमेध दौडतोच आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.