Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत भारतीय संघ फॉलोऑनच्या छायेत, शेवटच्या १५ मिनिटांत खेळ असा फिरला

Boxing Day Test : ३ बाद १५३ वरून भारतीय संघाची अवस्था ५ बाद १५९ अशी झाली आहे.

190
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत भारतीय संघ फॉलोऑनच्या छायेत, शेवटच्या १५ मिनिटांत खेळ असा फिरला
  • ऋजुता लुकतुके

मेलबर्न कसोटीत दुसरा दिवस अनेक अर्थांनी रोमांचक ठरला. स्टिव्ह स्मिथचं सुरेख शतक, ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४७४ धावा आणि त्याला उत्तर देताना यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या सत्रात केलेली शतकी भागिदारी असं सगळं शुक्रवारी पाहायला मिळालं. दिवसभरात ३२७ धावा झाल्या आणि नऊ गडी बाद झाले. दिवसभर भरगच्च क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं. भारतीय फलंदाजांनी शेवटच्या १५ मिनिटांत केलेली हाराकिरी मात्र न समजण्यासारखी होती. (Boxing Day Test)

(हेही वाचा – माजी पंतप्रधान Dr. Manmohan Singh यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

विराट (३६) आणि जयस्वाल (८२) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी केली होती आणि दिवसाचा शेवटच्या अर्ध्या तासाचा खेळ बाकी होता. बोलंडच्या आधीच्या चेंडूवर जयस्वालने चौकार ठोकला होता आणि पुढच्याच चेंडूवर त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. विराटने प्रतिसाद दिला नाही. पण, तोपर्यंत यशस्वी दुसऱ्या टोकाला पोहोचलेला होता. कमिन्सने चेंडू अडवून यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीकडे पाठवला आणि कॅरीने बेल्स उडवण्याचं काम केलं. यशस्वी शतकासाठी १८ धावा हव्या असताना हकनाक बाद झाला. नाईटवॉचमन आकाशदीप फलंदाजीला आला. (Boxing Day Test)

आणि बोलंडच्या पुढच्याच षटकांत विराट कोहलीची उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याची जुनी सवय परत उफाळून आली. विराट कॅरीकडे झेल देऊन ३६ धावांवर परतला. भारताची अवस्था झाली ४ बाद १५४. भारतीय संघ आता बॅकफूटवर गेलेला होता. त्यातच नाईटवॉचमन आकाशदीपही शून्यावर बाद झाला आणि भारताचा निम्मा संघ १५९ धावांत तंबूत परतला. रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. (Boxing Day Test)

(हेही वाचा – Mumbai Weather : मुंबई धुक्यात हरवली; हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट)

भारतीय संघ सध्या ५ बाद १६४ अशा अवस्थेत आहे. कसोटीचे तीन दिवस अजून बाकी आहेत आणि फॉलो ऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला अजून ११० धावांची गरज आहे. आता मैदानात असलेली जोडी आणि त्यानंतर नितिश रेड्डी तसंच वॉशिंग्टन सुंदर हे दोन फलंदाज अजून खेळायचे बाकी आहेत. (Boxing Day Test)

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने २ तर बोलंडनेही २ गडी बाद केले. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या त्या स्टिव्ह स्मिथच्या १४० धावांच्या जोरावर. त्याला कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावा करत चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहने ९९ धावांत ४ गडी बाद केले. तर जडेजाला ३ बळी मिळाले. (Boxing Day Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.