Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत चहापानानंतर भारताचे ७ गडी बाद, कसोटीत १८४ धावांनी पराभव

Boxing Day Test : ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे

75
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत चहापानानंतर भारताचे ७ गडी बाद, कसोटीत १८४ धावांनी पराभव
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत चहापानानंतर भारताचे ७ गडी बाद, कसोटीत १८४ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

मेलबर्न कसोटीत पुन्हा एकदा फलंदाजांनी संघाचा घात केला. पाचव्या दिवशी, विजयासाठी दिवसभरातील ८० षटकांत ३४० धावा भारतीय संघाला करायच्या होत्या. राहुल, रोहित आणि विराट हे पहिले तीन फलंदाज ३३ धावांत बाद झाल्यानंतर जयसवाल आणि पंत यांनी दुसरं अख्खं सत्र सावधगिरीने खेळून काढलं तेव्हा वाटलं आता भारतीय संघ निदान कसोटी अनिर्णित राखू शकेल. पण, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खेळात दाखवलेली शिस्त भारतीय फलंदाजांना अजिबात दाखवता आली नाही. आणि चहापानाला ३ बाद ११२ अशी अवस्था असताना पुढील दीड तासांत भारतीय संघ चक्क १५५ धावांवर सर्वबाद झाला. (Boxing Day Test)

(हेही वाचा- न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल होणार; SC Collegeum मोठा निर्णय घेणार)

सगळ्यात आधी रिषभ पंतने हाराकिरी केली. मेलबर्न सारख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या मैदानावर त्याने लाँग ऑनला चेंडू टोलवण्याचा पर्याय स्वीकारला. सगळं सुरळीत सुरू असताना रिषभ पंत कामचलाऊ गोलंदाज ट्रेव्हिस हेडच्या गोलंदाजीवर ३० धावांवर बाद झाला. आणि ऑस्ट्रेलियासारख्या व्यावसायिक खेळाडूंना एकदा विजयाची संधी निर्माण झाल्यावर काय करायचं हे नेमकं ठाऊक आहे. पॅट कमिन्सने गोलंदाजीत नियमित बदल करत फलंदाजांवरील दडपण वाढवत नेलं. बोलंडच्या एका अचानक उसळलेल्या चेंडूवर रवींद्र जाडेजा २ धावा करून बाद झाला. (Boxing Day Test)

आधीच्या डावातील शतकवीर नितिश रेड्डी एका धावेतच तंबूत परतला. ऑस्ट्रेलियन संघातील गोलंदाजीतील विविधता भारतीय संघाला अडचणीत आणत होती. कमिन्सने संघातील ७ गोलंदाज वापरले. आणि सगळ्यांनी मिळून भारतीय फलंदाजांभोवती जाळं विणलं.  (Boxing Day Test)

आकाशदीप ७ आणि बुमराह ० धावांवर बाद झाला. पंत बाद झाल्यावर यशस्वी जयसवालचाही धीर सुटलेला होता. त्याने त्याच्या डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारे चेंडू खेळण्याचा २-३ वेळा प्रयत्न केला. असाच एक कमिन्सचा लेगसाईडला जाणारा चेंडू खेळताना त्याच्या ग्लव्हना लागून चेंडू यष्टीरक्षक कॅरीकडे गेला. तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यावर स्निकोमीटर ग्लव्हजना लागलेलं दर्शवत नव्हता. पण, चेंडूची दिशा बदलल्याचं कळत होतं. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यशस्वीला बाद दिलं. आणि त्यान सकारात्मक केलेली खेळी ८४ धावांवर संपुष्टात आली. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Sion Panvel Highway आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लीनिंग मोहीम; प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना)

यशस्वी बाद झाल्यानंतर भारतीय संघाला उर्वरित २१ षटकं खेळून काढायची होती. पण, रक्ताची चटक लागलेल्या ऑस्ट्रेलियाला त्यानंतर थांबवणं कठीण होतं. ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत आता २-१ अशी आघाडी घेतली आहे. पाचवी आणि शेवटची कसोटी ३ जानेवारीपासून सिडनीला होणार आहे. ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवली तर भारतीय संघाकडे बोर्डर – गावसकर करंडक कायम राहू शकेल. कसोटी अजिंक्यपदाची आशाही तरंच जीवंत राहील. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.