India vs Ireland T-20 : कर्णधार पदाच्या नवीन जबाबदारीबद्दल बुमरा काय म्हणतो?

पावसामुळे अखेर पंचांना सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

179
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला सक्तीची विश्रांती
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला सक्तीची विश्रांती
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध आयर्लंड दरम्यानच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. सामना अनिर्णित राहिला. पण, भारताने ही मालिका २-० अशी जिंकली. भारत आणि आयर्लंड दरम्यानचा तिसरा टी-२० सामना पावसात वाहून गेला. नाणेफेकीच्या पंधरा मिनिटं आधी सुरू झालेला पाऊस पुढचे साडेतीन तास न थांबता कोसळला. आणि अखेर पंचांना सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

सामन्याच्या सकाळी भारतीय क्रिकेट संघाने भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोनं पाठवलेलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तो क्षण लाईव्ह पाहिला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना मानवंदना दिल्यानंतरच खेळाडूंनी सरावासाठी मैदान गाठलं. पण, पावसाचा विचार काही वेगळाच होता. आयर्लंडच्या मेलाहाईड इथं सतत कोसळलेल्या पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना ३-० असा आठवा व्हाईटवॉश देण्याची भारतीय संघासमोरची संधी विरली.

सव्वादहाच्या सुमारास पाऊस थांबला होता. पण, तोपर्यंत आउटफील्डवर तळं साचलं होतं. आणि पंचांनी मैदानाचं निरीक्षण केल्यानंतर सामना होऊ शकत नसल्याचं जाहीर केलं. पावसामुळे तिसरा टी-२० सामना होऊ शकला नाही. पण, भारतीय संघाने ही मालिका २-० अशी जिंकली. पहिल्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे २ धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ३३ धावांनी विजय साकारला. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा यांच्यासाठी ही मालिका पुनरागमनाची मालिका होती.

(हेही वाचा – NCP : शरद पवारांचा फोटो वापरायचा का? अजित पवार गटाने घेतला निर्णय)

आणि जसप्रीतने दुसऱ्या सामन्यात ४ बळी मिळवत मालिकावीर होण्याचा मानही पटकावला. या मालिकेत ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग तसंच संजू सॅमसन यांच्यासाठी फलंदाजीच्या सरावाची चांगली संधी होती. ती त्यांनी साधलीही. तर दुखापतीनंतर दहा महिन्यांनी मैदानावर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमरावर नेतृत्वाचीही जबाबदारी होती. त्याबद्दल बोलताना बुमरा म्हणाला, ‘संघाचं नेतृत्व करणं हा बहुमान आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये तुम्हाला जबाबदारी उचलायची इच्छा असते. आणि नेतृत्व ही तर सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे ही संधी दिल्याबद्दल संघ प्रशासनाचा मी आभारी आहे. तरुण आणि तेजतर्रार खेळाडूंमुळे ही जबाबदारीही सोपी गेली.’ अकरा महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळायला मिळतंय याचं खूप मोठं समाधान आहे, असंही जसप्रीत म्हणाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.