-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाचा रखडलेला प्रश्न अखेर आयसीसीने मार्गी लावला आहे. २०२५ ची स्पर्धा हायब्रीड पद्धतीने होणार, त्यामुळे भारताचे स्पर्धेतील सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार हे आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर भारत पाकिस्तानात खेळणार नसेल, तर पाकिस्तानी खेळाडूही भारतात जाणार नाहीत, ही पाक बोर्डाची भूमिकाही आयसीसीने मान्य केली आहे. त्यामुळे फक्त चॅम्पियन्स करंडकच नाही, तर इथून पुढे २०२७ पर्यंतच्या भारत किंवा पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्वच आयसीसी स्पर्धा हायब्रीड पद्धतीने घेतल्या जातील. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Malegaon News : मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कारच्या गाडीवरती गो तस्करांचा हल्ला)
चॅम्पियन्स करंडकाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. त्यासाठी गेले काही दिवस आयसीसीने सर्व सदस्य देशांच्या ऑनलाईन बैठका घेतल्या. त्यानंतर एक विशेष पत्रकच त्यांनी गुरुवारी जारी केलं. यात भारत किंवा पाकिस्तानात होणाऱ्या स्पर्धांविषयी सर्वसहमतीने काढलेला तोडगा नमूद करण्यात आला आहे. चॅम्पियन्स करंडकातील भारताचे सामने संयुक्त अरब अमिरातीत होणार हे स्पष्ट झालं असलं, तरी स्पर्धेचं वेळापत्रक अजूनही आयसीसीने प्रसिद्ध केलेलं नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. (Champions Trophy 2025)
आता ठरवलेलं हायब्रीड मॉडेल हे २०२७ पर्यंतच्या भारत किंवा पाकिस्तानला होणाऱ्या सर्व आयसीसी स्पर्धांसाठी असेल. यात दोन्ही देश एकमेकांचा दौरा करणार नाहीत असं गृहित धरून उभय देशांदरम्यानचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतील. चॅम्पियन्स करंडकासह २०२५ मध्ये होणारा महिला टी-२० विश्वचषक (यजमान – भारत), २०२६ चा भारत आणि श्रीलंकेत होणारा टी-२० विश्वचषक या स्पर्धाही आता हायब्रीड पद्धतीने होतील. २०३१ साली चॅम्पियन्स स्पर्धा भारतात होणार आहे. त्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- BMC School : महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना आता सायबर साक्षरतेचे धडे)
भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जायला नकार दिल्यामुळे ही समस्या सुरू झाली. केंद्रसरकारने क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवायला परवानगी नाकारली. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया चषकात हायब्रीड मॉडेलचा वापर झाला होता. भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. पण, चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानने सुरुवातीला हायब्रीड मॉडेलसाठी नकार दिला. आणि जेव्हा होकार दिला तेव्हा भारतातील आगामी काळातील स्पर्धाही हायब्रीड पद्धतीने भरवण्याची मागणी केली. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाचं घोडं अडलं होतं. पण, आता या निर्णयानंतर स्पर्धेविषयीची अनिश्चितता दूर झाली आहे. (Champions Trophy 2025)
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पहिले ८ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community