- ऋजुता लुकतुके
आयसीसी चॅम्पियन्स करंडकाचं भिजत घोंगडं असून तसंच आहे. आयसीसीकडे एक पर्याय आहे तो हायब्रीड मॉडलचा. म्हणजे भारताचे सामने पाक बाहेर दुबई, श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याचा. पण, हा पर्याय पाकिस्तानला मान्य नाही. त्यांनी भारताने पाकिस्तानला यावं असा आग्रह धरला आहे. त्यासाठी लाहोरमध्ये एकाच मैदानावर भारताचे सगळे सामने आयोजित करण्याची तयारी इतके दिवस पाकिस्तानने ठेवली होती. पण, भारताने पाकिस्तानमध्ये येण्याची तयारीच नसल्याचं म्हटल्यावर आता पाकने नवीन पर्याय ठेवला आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Narayan Savarkar : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर)
भारताने आपला प्रत्येक सामना खेळल्यावर मायदेशी परत जावं आणि पुढील सामन्यासाठी पुन्हा यावं असा हा पर्याय आहे. सामना खेळून झाल्यानंतर खेळाडूंना चंदिगड किंवा दिल्लीला पोहोचवण्याची जबाबदारी पाकिस्तान बोर्ड घ्यायला तयार आहे. हा प्रस्ताव दिसायला विचित्र दिसत असला तरी यातून पाकिस्तानची अगतिकताही दिसत आहे. भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारली तर हा पर्याय पाकिस्तानने तयार ठेवला आहे. पण, काही झालं तरी भारताचे सामने पाकिस्तानमध्ये व्हावेत असा सध्या त्यांचा प्रयत्न आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Aditya Thackeray यांनी एबी फॉर्म दिले, आमदारांनी नाकारले; नक्की काय आहे आमदारांच्या मनात ?)
भारतीय संघाने २००८ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. अलीकडे आशिया चषकाचं आयोजन पाकिस्तानने केलं. पण, भारताचे सामने हे श्रीलंकेत खेळवण्यात आले. पण, या हायब्रीड मॉडेलमध्ये पाकस्तानचं आर्थिक नुकसानच होतं. त्यामुळे काही झालं तरी भारताने पाकिस्तानमध्ये निदान सामने खेळण्यासाठी यावं असा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानमध्ये १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर ही पहिली आयसीसी स्पर्धा होणार आहे. पाक क्रिकेट बोर्डाची आर्थिक अवस्था सध्या डबघाईला आलेली असल्यामुळे त्यांना चॅम्पियन्स करंडक आयोजनामध्ये नितांत रस आहे. स्पर्धा ठरल्याप्रमाणे पार पडावी असा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानमध्ये सध्या कसोटी मालिका पुन्हा सुरू झाल्या असून सध्या इंग्लिश संघ मुलतान या एकाच ठिकाणी ३ कसोटींची मालिका खेळत आहे. चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनाच्या तयारीवर आयसीसीचंही नियमित लक्ष आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community