Champions Trophy 2025 : रोहित शर्मा अखेर पाकिस्तानला जाणार नाही

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचा कर्णधारांचा मेळावाच रद्द झाल्याची बातमी आहे

35
Champions Trophy 2025 : रोहित शर्मा अखेर पाकिस्तानला जाणार नाही
Champions Trophy 2025 : रोहित शर्मा अखेर पाकिस्तानला जाणार नाही
  • ऋजुता लुकतुके

यंदा चॅम्पियन्स करंडकाचं भिजत घोंगडं काही वर्षं चाललं. शेवटी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि त्यांचे सामने दुबईला हलवण्यात येतील हा निर्णय झाल्यावर स्पर्धेचं धोडं पुढे सरकलं. पण, तरीही समस्या संपेनात. आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेपूर्वी उद्घाटनाचा सोहळा होतो. आणि सर्व संघांच्या कर्णधारांचं एकत्र फोटो – शूट होतं आणि पत्रकार परिषद होते. हा कार्यक्रम पाकिस्तानातच झाला पाहिजे, कारण ते मुख्य यजमान आहेत, असा पाकिस्तानचा आग्रह होता. आणि पाकिस्तानमध्ये हा कार्यक्रम झाला तर कर्णधार रोहित शर्मा त्यासाठी पाकिस्तानला जाणार का हा प्रश्न आता निर्माण झाला. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Jammu and Kashmir मधील पुंछमध्ये 2 दहशतवादी ठार ; LoC जवळ घुसखोरीचा प्रयत्न; शोध मोहीम सुरू)

पण, क्रिकबझने दिलेल्या बातमीनुसार, हा प्रश्नही परस्पर मिटला आहे. चॅम्पियन्स करंडकाचं एकत्र फोटो-शूट रद्द झालं आहे. ‘चॅम्पियन्स करंडकाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयसीसी किंवा पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्याकडून कधी जाहीरच झाला नव्हता. त्यामुळे तो होणारच नव्हता. चॅम्पियन्स करंडकासाठी शेवटचा उद्गाटन सोहळा २०११ मध्ये ढाक्यात झाला होता. त्यानंतर असा एकत्र कार्यक्रम झालेलाच नाही. त्यामुळे आताही रोहित शर्मा पाकिस्तानला जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही,’ असं क्रिकबझच्या बातमीत म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)

तर पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, पाक बोर्डाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. कारण, सर्वच संघांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळेत पाकिस्तानला पोहोचणं शक्य होणार नव्हतं. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका असे सगळेच देश मालिकांमध्ये व्यस्त आहेत. पाकिस्तानकडून १६ फेब्रुवारीला स्पर्धा सुरू झाल्याची एक औपचारिक घोषणा होईल, असं पीटीआयने म्हटलं आहे.  (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीला पाहायला अरुण जेटली मैदानावर १५,००० प्रेक्षक, कोहलीला गोलंदाजी देण्याची केली मागणी )

यंदा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तान आणि दुबईत चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रंगणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना २३ फेब्रुवारीला दुबईतच होईल. पाकिस्तानमध्ये लाहोर, कराची आणि रावळपिंडी इथं स्पर्धेचे सामने होणार आहेत. येत्या ७ फेब्रुवारीला लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमचं नुतनीकरणाचं काम पूर्ण होणार आहे. तर कराचीतील स्टेडिअम ११ आणि रावळपिंडीतील स्टेडिअम १७ फेब्रुवारीला सज्ज होईल. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.