- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण, ऑस्ट्रेलियात कमालीचा यशस्वी ठरलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही मालिका खेळण्याची शक्यता कमीच आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी कसोटीत पाठीत उसण भरल्यामुळे बुमराहला (Jasprit Bumrah) चौथ्या डावांत गोलंदाजी करता आली नाही. भारताने ही कसोटीही ६ गडी राखून गमावली. आता आगामी इंग्लंड विरुद्धची मालिका आणि त्यानंतर होणारी महत्त्वपूर्ण चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, यात बुमराचा सहभाग अनिश्चित आहे.
५ कसोटींच्या बोर्डर – गावसकर मालिकेत (Border – Gavaskar series) भारतीय गोलंदाजीचा भार एकट्या बुमराहने वाहिला. दोन महिन्यात ३० वर्षीय बुमराहने १५४ षटकं टाकली. चौथ्या मेलबर्न कसोटींत तर रोहीतने त्याला चक्क ९ स्पेलमध्ये वापरलं. त्याचा परिणाम बुमराहच्या (Jasprit Bumrah) तब्येतीवर झाला आहे. आणि सिडनीत त्याला तिसरा दिवस तंबूत बसून काढावा लागला. नेतृत्व करण्यासाठीही तो मैदानात उतरू शकला नाही.
(हेही वाचा – RCMS : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ १५ दिवसांपासून बंद; नागरिक त्रस्त)
त्यामुळे बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय चमूने त्याला लवकरात लवकर भारतात परतून वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. १९ फेब्रुवारीला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला (Champions Trophy 2025) सुरुवात होणार आहे. आणि त्यासाठी पंधरा जणांचा संघ निवडण्याची मुदत १२ जानेवारीपर्यंत आहे. म्हणजे बुमराहच्या दुखापतीविषयीचा निर्णय बीसीसीआयला (BCCI) त्यापूर्वी घ्यायचा आहे. अर्थात, संघ निवडीनंतर १२ फेब्रुवारीपर्यत त्यात बदल करण्याची संधीही भारताला आहे.
पण, त्यासाठी बुमराह (Jasprit Bumrah) वेळेत तंदुरुस्त होणं महत्त्वाचं आहे. आणि आगामी इंग्लंडविरुद्घच्या मालिकते बुमराह (Jasprit Bumrah) खेळण्याची शक्यता कमीच आहे. पाठीत भरलेली उसण दुसऱ्या श्रेणीतील असेल तर त्याला ६ आठवडे विश्रांती लागेल. तिसऱ्या श्रेणीची असेल तर ३ महिने तो क्रिकेटपासून दूर जाऊ शकतो. तिसरी श्रेणी ही गंभीर दुखापत मानली जाते.
दुसरीकडे, मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) उपस्थितीविषयी अजून पूर्ण माहिती मिळालेली नाही. गोलंदाजी करताना त्याच्या गुडघ्याला सूज येत असल्यामुळे अख्खी मालिका तो खेळल अशी शक्यता कमीच आहे. बुमराह आणि शमी हे सध्याचे भारतातील दोन अव्वल तेज गोलंदाज आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध आणि चॅम्पियन्स करंडकातही (Champions Trophy 2025) भारतीय आक्रमणातील धार नक्कीच कमी होऊ शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community