-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकात आपली विजयाची मालिका कायम ठेवत अंतिम सामनाही ४ गडी राखून जिंकला. आणि अखेर १३ वर्षांनंतर चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरलं. रोहित शर्माच्या ७६ धावा आणि श्रेयस अय्यर (४८) आणि के. एल. राहुल (नाबाद ३४) यांनीही भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. भारतीय संघाने आता विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली आहे. या विजेतेपदासाठी भारतीय संघाला विक्रमी २० कोटी रुपये रोख बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेत्या किवी संघाला रोख ९.४ कोटी रुपये मिळणार आहेत. (Champions Trophy Final)
पण, विरोधाभास हा की, भारतीय संघातील एक खेळाडू रिषभ पंत या स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. पण, त्याला आयपीएलमध्ये आपल्या संघातून खेळवण्यासाठी लखनौ सुपरजायंट्सनी २७ कोटी रुपये मोजले आहेत आणि भारतीय खेळाडूंना मिळून २० कोटी रुपये मिळणार आहेत. चॅम्पियन्स करंडक पुन्हा घरी आणल्याबद्दल बीसीसीआयने खेळाडूंचं कौतुक केलं आहे. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Gandhi-Irwin Pact : भगतसिंग यांची फाशी गांधींनी रोखली नाही; दडपले जात आहे ऐतिहासिक सत्य)
‘भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यांनी कसलेल्या प्रतिस्पर्धी संघांना निर्विवादपणे हरवलं. आणि बेडर तसंच शिस्तबद्ध खेळाचं प्रात्यक्षिक घडवलं. आयसीसी स्पर्धांमध्ये ज्या सातत्याने भारतीय संघ विजय मिळवतोय, ते पाहता या संघाचीं वर्चस्व अधोरेखित होतं. या विजयासाठी रोहित शर्मा, संघातील सर्व खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं अभिनंदन!’ असं बीसीसीआयने अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (Champions Trophy Final)
भारतीय संघाने २०२४च्या टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर हे सलग दुसरं आयसीसी विजेतेपद जिंकलं आहे. शिवाय आयसीसीच्या टी-२० आणि एकदिवसीय स्पर्धेत मिळून भारताने शेवटच्या २३ पैकी तब्बल २१ सामने जिंकले आहेत. दुबईतून परतल्यावर भारतीय संघातील खेळाडूंचा वानखेडे स्टेडिअमवर सत्कार करण्यात येणार आहे. (Champions Trophy Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community