- ऋजुता लुकतुके
भारत आणि न्यूझीलंडचे संघ रविवारी चॅम्पियन्स करंडकासाठी (Champions Trophy Final) आमने सामने येतील तेव्हा या स्पर्धेतील आतापर्यंतच्या दोन सातत्यपूर्ण संघांमधील हा मुकाबला असेल. त्यामुळे रंगतदार लढतीची अपेक्षा सर्वांनाच आहे. पण, भारतीय संघ दुबईतच गेले १५ दिवस तळ ठोकून आहे. त्यामुळे इथल्या वातावरणाची त्यांना सवय झालीय. त्यावरून म्हणजे स्पर्धेच्या कार्यक्रमावरूनही आयसीसीवर (ICC) टीका होतेय. पण, न्यूझीलंडच्या गोटात मात्र संघाला या गोष्टीची फारशी काळजी दिसत नाही. त्यांना वातावरणाची नाही तर भारतीय संघातील एका खेळाडूची भीती वाटत आहे.
‘वरुण आमच्या खेळाडूंचे सगळे इरादे धुळीला मिळवू शकतो,’ असं थेट विधान किवी मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stead) यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. ‘वरुण खूपच चांगला गोलंदाज आहे. त्याची दहा षटकं सामन्याचा नूर पालटवू शकतात. आम्ही आधी खेळपट्टीचा नीट अभ्यास करू. आणि खेळपट्टीवर वरुण किती प्रभावी ठरू शकेल, याचा आम्ही नीट आढावा घेऊ. त्यानुसार, त्याला कसं खेळायचं याचा विचार करू,’ असं स्टेड (Gary Stead) यांनी सांगितलं.
(हेही वाचा – ST महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक)
साखळी सामन्यांत भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्यातील खेळपट्टी आतापर्यंतची सगळ्यात धिमी होती. आणि भारतीय संघाने न्यूझीलंडला ४१ षटकांतच २०५ धावांत सर्वबाद केलं होतं. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) ५ बळी मिळवले होते. केन विल्यमसनसह (Kane Williamson) सगळ्या महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने बाद केलं. त्याच्या पुढच्याच सामन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्धही वरुणने ४९ धावांत २ गडी बाद केले. यात त्याच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने धोकादायक ट्रेव्हिस हेडला (Travis Head) बाद केलं. खासकरून रात्री कृत्रिम प्रकाशझोतात त्याची गोलंदाजी जास्त प्रभावी ठरत आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसरी गोलंदाजी करत असेल तर वरुणची मधली षटकं खेळणं अवधड होऊन बसलं आहे.
न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे तो मॅट हेन्रीच्या अनुपस्थितीचा. खांद्याच्या दुखापतीमुळे तो अंतिम सामना खेळण्याची शक्यता कमीच आहे. पण, आतापर्यंतचा स्पर्धेतील तो प्रभावी गोलंदाज आहे. आणि त्याने ४ सामन्यांत १० बळी मिळवले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community