Champions Trophy, Ind vs Ban: बांगलादेशला ६ गडी राखून हरवत भारताची विजयी सलामी 

Champions Trophy, Ind vs Ban : महम्मद शामीचे ५ बळी, शुभमनचं शतक सामन्याची वैशिष्ट्य ठरली 

57

ऋजुता लुकतुके

भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या लढतीत म्हटलं तर अलीकडच्या टी-२० (T-20) जमान्यात फक्त ४५९ धावा झाल्या. (एरवी ७०० ही होऊ शकतात.) तरीही सामन्यात दोन मोक्याच्या क्षणी सुटलेले झेल, दोन शतकं, दोन सामन्याची दिशा ठरवणाऱ्या भागिदाऱ्या आणि एक डावांत पाच बळी टिपणारी कामगिरी इतकी सारी ॲक्शन भरलेली होती. शेवटी शुभमन गिलच्या (Shubman Gill) १२९ चेंडूंतील १०१ धावा त्याने के एल राहुलबरोबर केलेली नाबाद ८७ धावांची भागिदारी आणि महम्मद शामीचे ५३ धावांत ५ बळी निर्णायक ठरले. (Champions Trophy, Ind vs Ban)

सामन्यातील दोन सुटलेल्या झेलांची मात्र दीर्घकाळ चर्चा होत राहील. आधीच खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी नव्हती. त्यात अक्षर पटेलने जम बसलेल्या तनझिद हसनला २५ धावांवर बाद केलं. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मुश्फिकूर रहिमचाही काटा काढली. आणि बांगालेदशची अवस्था ५ बाद ३५ अशी बिकट झाली. पुढचा चेंडू हॅट ट्रीकचा होता. झकर अलीने चेंडूच्या मार्गात बॅट घातलीही. पहिल्या स्लिपमध्ये झेल उडाला. पण, रोहीतने हा सोपा झेल सोडला. अक्षरची हॅट ट्रीक तर हुकलीच. शिवाय झकरने पुढे जाऊन ६८ धावा केल्या. तौफिक ह्रदय बरोबर १५४ धावांची भागिदारी केली. ह्रदयने शानदार १०० धावा केल्या. आणि त्याच्या जोरावर बांगलादेश २२८ धावांपर्यंत पोहोचलं. भारतासाठी शामीने ५, हर्षितने ३ आणि अक्षरने २ बळी घेतले. हा होता सुटलेला पहिला झेल ज्याने एका डावाची दिशाच बदलली.

(हेही वाचा – Naxalite : पोलीस चकमकीत चार जहाल महिला नक्षलवादी ठार)

सुटलेला दुसरा झेल भारताच्या डावांत आला. शुभमन गिल एका बाजूने किल्ला लढवत होता. पण, रोहीत (४१), विराट (२२), अक्षर (८) आणि श्रेयर (१५) वर बाद झाले होते. भारताची अवस्था ४ बाद १४४ होती. आणि खेळपट्टी नवीन फलंदाजासाठी आव्हानात्मक होती. नवीन फलंदाज के एल राहुलचाही अंदाज चुकला. रफिकच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ राहुलचा झेल उडाला. डीप स्केअरला झकरने हा सोपा झेल सोडला. राहुल तेव्हा ८ धावांवर होता. आणि त्यानंतर त्याने शुभमनला आवश्यक साथ देत भारताला विजय मिळवून दिला. दोघांना पाचव्या गड्यासाठी ८७ धावांची भागिदारी केली. राहुल ४१ धावांवर नाबाद राहिला. तर शुभमनने एकदिवसीय सामन्यांतील आपलं सलग दुसरं शतक झळकावलं.

शुभमन गिलने (Shubman Gill) शतक पूर्ण केलं ते १२४ चेंडूंमध्ये. २०१८ नंतरचं एकदिवसीय क्रिकेटमधील हे सगळ्यात धिमं शतक होतं. पण, संघाची गरज ओळखून आणि खेळपट्टी समजून घेऊन केलेलं. कारण, दुबईतील खेळपट्टी अतिशय धिमी होती. फ्रंटफूटवर धावा निघत नव्हत्या. त्याच नादात विराट, श्रेयस आणि अक्षर जम बसलेला असताना बाद झाले होते. पण, शुभमनने एक बाजू शेवटपर्यंत लावून धरली. आणि उपकर्णधाराची जबाबदारी यथार्थ पेलली. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचं सातवं शतक. अखेर भारताने विजयासाठी आवश्यक २२९ धावा चार षटकं आणि ६ गडी राखून पूर्ण केल्या. आता भारताचा पुढील सामना २३ फेब्रुवारीला याच मैदानात पाकिस्तानशी होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.