Chess Ranking : जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अर्जुन एरिगसी चौथा, गुकेश पाचवा

Chess Ranking : एकाचवेळी पहिल्या दहांत दोन भारतीयांचा समावेश.

56
Chess Ranking : जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अर्जुन एरिगसी चौथा, गुकेश पाचवा
  • ऋजुता लुकतुके

भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी हे वर्ष कमालीचं यशस्वी गेलं आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण कमावलं आणि वर्ष संपता संपता डी गुकेशने १९ वर्षं १६५ दिवसांच्या वयात जगज्जेतेपदही पटकावलं आहे. भारतीय बुद्धिबळपटूंच्या या कामगिरीमुळे नवीन वर्षं सुरू होताना जागतिक क्रमवारीतही भारतीय बुद्धिबळपटूंनी आगेकूच केली आहे. ताज्या फिडे क्रमवारीत अर्जुन एरिगसी चौथा तर नवीन जगज्जेत्ता डी गुकेश पाचव्या स्थानावर आहे. (Chess Ranking)

अर्जुन अलीकडेच २८०० एलो गुण पार करणारा दुसरा भारतीय ठरला होता. तेव्हाच त्याने चौथं स्थान पटकावलं होतं. वर्ष संपताना त्याने ते कायम राखलं आहे. तर त्याच्या पाठोपाठ गुकेश पाचवा आला आहे. गुकेशकडे सध्या २,७८३ एलो रेटिंग गुण आहेत आणि कामगिरीतील सातत्य कायम राहिलं तर यंदा तो २,८०० गुणही पार करू शकतो. अर्जुन हा टप्पा पार करणारा फक्त दुसरा भारतीय आणि जगातील १६ वा बुद्धिबळपटू ठरला आहे. त्यानंतर जागतिक क्रमवारीत पहिल्यांदाच त्याने विश्वनाथन आनंदलाही मागे टाकलं होतं. (Chess Ranking)

(हेही वाचा – National Sports Awards : मनु भाकरसह गुकेशलाही खेलरत्न, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर)

नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचं क्रमवारीवरील प्रभूत्व आजही टिकून आहे आणि २,८३१ गुणांसह आजही तो अव्वल आहे. अमेरिकेचे फाबिओ कारुआना (२,८०३) आणि हिराकू नाकामुरा (२,८०२) गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर विश्वनाथन सध्या स्पर्धा करत नसला तरी २,७५० एलो गुणांसह तो आजही दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या दहांत चक्क तीन भारतीय बुद्धिबळपटू झळकले आहेत. (Chess Ranking)

शिवाय आर प्रग्यानंदा तेराव्या स्थानावर आहे आणि अरविंद चिदंबरम, विदिथ गुजराथी, हरिकृष्णा, निहाल सरिन आणि रौनक सिधवानी हे इतर भारतीय बुद्धिबळपटूही पहिल्या पन्नासांत आहेत. महिलांमध्ये फिडे क्रमवारीवर सध्या चीनचं वर्चस्व दिसत आहे. तर भारताची दिव्या देशमुख २,४९० एलो गुणांसह तेराव्या स्थानावर आहे. द्रोणवल्ली हरिका सोळाव्या आणि आर वैशाली एकोणीसाव्या क्रमांकावर आहेत. (Chess Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.