ऋजुता लुकतुके
१२३ वर्षांपूर्वी क्रिकेटने फक्त एकदा ऑलिम्पिकमध्ये ओझरता प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा ती संधी या खेळाकडे चालून आली आहे. २०२८च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये आयोजकांनी निवडलेल्या ५ खेळांमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश आहे. आणि या आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (Cricket in Olympics) संघटनेची मान्यता मिळाली, तर क्रिकेट खरंच पुन्हा एकदा ऑलिम्पिकचा भाग होऊ शकेल.
ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवणाऱ्या देशाच्या राष्ट्रीय क्रीडा संघटनेला आपल्या पसंतीचे पाच खेळ स्पर्धेत खेळवण्याची परवानगी असते. यंदा लॉस एंजलीस आयोजन समितीने बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि स्कॉश या खेळांची शिफारस केली आहे.
आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक येत्या १२ ऑक्टोबरला मुंबईतच होत आहे. तिथे अंतिम खेळांविषयी चर्चा होईल. तिथं शिक्कामोर्तब झालं तर क्रिकेटचा ऑलिम्पिक (Cricket in Olympics) समावेश नक्की होईल. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी या बातमीनंतर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
‘आयोजन समितीने क्रिकेटच्या समावेशाची इच्छा दाखवल्यामुळे नक्कीच आनंद झाला आहे. पण, अंतिम समावेश अजून नक्की झालेला नाही. अमेरिके सारख्या देशाने क्रिकेटच्या समावेशाची तयारी दाखवली हे मात्र खूप मोठं आणि या खेळाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे,’ असं आयसीसीने काढलेल्या पत्रकात बार्कले यांनी म्हटलं आहे.
क्रिकेटचा समावेश कसा झाला?
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (Cricket in Olympics) संघटनेनं आयोजकांबरोबर बसून २०२८ च्या ऑलिम्पिकसाठीचे २८ खेळ निश्चित केले. तेव्हाही क्रिकेटच्या नावाची चर्चा झाली होती. पण, ऑलिम्पिक नियमावलीचे काही निकष क्रिकेट पूर्ण करत नव्हता. जसं की, प्रत्येक खंडात किमान एक देश क्रिकेट खेळत असला पाहिजे असा एक महत्त्वाचा नियम आहे. पण, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही क्रिकेट खेळलं जात नाही.
त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या यादीत मुख्य खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश नव्हताच. पण, त्यानंतर गेल्याच वर्षी जुलै महिन्यात ऑलिम्पिक परिषदेनं ९ अतिरिक्त खेळांच्या यादीत क्रिकेट समाविष्ट केला. यातून पाच खेळ ऑलिम्पिकसाठी निवडले जाणार होते. त्यामुळे क्रिकेटच्या पाठीराख्यांचा उत्साह पुन्हा वाढला. आयोजन अमेरिकेचं मन वळवण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले. आणि त्याला आतापर्यंत तरी यश मिळालेलं दिसत आहे.
(हेही वाचा-MLA Disqualification : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात फटका, सुनावणी पुन्हा लांबणीवर)
क्रिकेटचं अमेरिकन नातं
अमेरिकेत जे काही क्रिकेट खेळलं जातं ते तिथे वसलेल्या भारत आणि एकूणच आशियाई देशांतील लोकांमुळेच. पण, आशियाई निर्वासितांची संख्या तिथे वाढत चाललीय. आणि त्यामुळे तिथेही अनेक राज्यं तसंच काऊंटी सध्या क्रिकेटसाठी मैदानं राखून ठेवण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत.
अलीकडेच भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टी-२० मालिकेतील दोन शेवटचे सामने हे फ्लोरिडा इथं म्हणजे अमेरिकेत खेळवण्यात आले. तसंच २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचं संयुक्त यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका भूषवणार आहेत. या स्पर्धेसाठी अमेरिकेनं फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी वापरता येतील अशी तीन भव्य स्टेडिअम फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि लॉस एंजलिस इथं उभारण्याची तयारीही दाखवली.
अशा प्रकारे अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात, हा कायमस्वरुपी समावेश नसेल. कारण, मुख्य २८ खेळांमध्ये अजून क्रिकेटचा समावेश नाही. आयोजकांनी पसंती दिलेल्या खेळांमध्ये क्रिकेट आहे. आयोजकांची निवड प्रत्येक यजमान देशानुसार बदलू शकते.
क्रिकेटचं ऑलिम्पिक पदार्पण
यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता तो १९०० साली. या गोष्टीला आता १२३ वर्षं उलटून गेली. फ्रान्सच्या पॅरिस शहरात हे ऑलिम्पिक भरलं तेव्हा भारतासह अनेक आशियाई आणि आफ्रिकी देश युरोपीयन वसाहती म्हणून ओळखले जात होते. त्यांना स्वातंत्र्यही मिळालं नव्हतं.
त्यामुळे स्पर्धेत इंग्लंड आणि यजमान फ्रान्स हे दोनच संघ सहभागी झाले. फ्रान्सचा संघही इंग्लंडमधून फ्रान्समध्ये आश्रय घेतलेल्या लोकांचा होता. इंग्लंडने तेव्हा सुवर्ण जिंकलं होतं. आता क्रिकेट मोठ्या स्वरुपात ऑलिम्पिक पुनरागमनाची तयारी करत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community