महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेवर विजय, जेमिमाची दमदार खेळी

113

आशिया चषकमध्ये भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा श्रीलंकेसोबत पराभव झाला, मात्र याचे उट्टे महिला क्रिकेट संघाने भरून काढले. आशिया चषकातील सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्यात भारताची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स आजच्या सामन्यात चांगलीच चमकली. जेमिमाने आजच्या सामन्यात ५३ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७६ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला २० षटकांमध्ये ६ बाद १५० अशी दमदार मजल मारता आली. यावेळी जेमिमाला कर्णधार हरमनप्रीत कौरची चांगली साथ मिळाली. कौरने यावेळी ३० चेंडूत ३३ धावांची खेळी केली.

४१ धावांनी विजय 

भारताच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने श्रीलंकेला दोन धक्के दिले. या धक्क्यातून श्रीलंकेचा संघ सारवू शकला नाही. कारण त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी एकामागून एक विकेट्स मिळवल्या आणि श्रीलंकेचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ यावेळी शतकही साकारणार नाही, असे वाटत होते. पण तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी केल्यामुळे श्रीलंकेला अखेर शतकाची वेस ओलांडता आली. श्रीलंकेच्या संघाने शतक पूर्ण केले असले तरी त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. कारण श्रीलंकेचा डाव यावेळी १०९ धावांवर आटोपला आणि भारताला ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.

(हेही वाचा आता चीनची MI मोबाईल कंपनी ईडीच्या रडारवर, काय होणार कारवाई?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.