- ऋजुता लुकतुके
रस्ते अपघातामुळे क्रिकेटपासून दूर असलेला डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार हे निश्चित झालंय. दिल्ली कॅपिटल्स या त्याच्या संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिला आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात रिषभच्या गाडीला यमुना एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला होता. वेगात असलेली त्याची गाडी रस्ता दुभाजकावर आदळली होती. आणि त्यानंतर गाडीने पेट घेतला. आजूबाजूच्या गावातील लोकांनी रिषभला वाचवलं. आणि रुग्णालयात भरती केलं.
एअरबॅगमुळे रिषभचा जीव वाचला असला तरी झालेला अपघात मोठा होता. आणि रिषभला अनेक ठिकाणी फ्रॅक्चरही झालं होतं. सुरुवातीच्या उपचारांनंतर रिषभ मागचे ८ महिने बंगळुरू इथं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. तिथे क्रीडाविषयक तज्ज डॉक्टर त्याची देखभाल करत आहेत.
(हेही वाचा Ravi Rana : अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीवर रवी राणांचा दावा; दिवाळीत मोठा बॉम्ब फुटले)
हळूहळू तो सरावालाही लागला आहे. या विचित्र अपघातातून बाहेर येण्यासाठी आणि पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी रिषभने अतुलनीय जिद्द आणि चिकाटी दाखवली आहे. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या जादवपूर विद्यापीठ सॉल्ट लेक मैदानात झालेल्या सरावालाही रिषभ (Rishabh Pant) उपस्थित होता. दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी पंतच्या तंदुरुस्तीविषयीचा अपडेट पत्रकारांना दिला.
‘तो आता बरा आहे. पुढील हंगामात तो नक्की खेळेल. आणि कर्णधार म्हणूनही परतेल. सध्या संघाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी तो आलाय. खेळाडूंनी एकत्र यावं यासाठी हे शिबीर आयोजित केलं होतं,’ असं गांगुली पत्रकारांना म्हणाले.
१९ डिसेंबरला दुबईत आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव आहे. त्यापूर्वी संघाची रणनीती ठरवण्यासाठी रिषभ जातीने सरावाला आला होता. पण, त्याने प्रत्यक्ष सरावात सहभाग घेतला नाही. ‘प्रत्यक्ष मैदानात उतरण्यासाठी रिषभला जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. पण, आयपीएलपूर्वी त्याच्याकडे तितका वेळ आहे. आणि तंदुरुस्त होण्यासाठी ही स्पर्धाही चांगली आहे,’ असं गांगुली म्हणाले. यावर्षीच्या हंगामात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व केलं.
Join Our WhatsApp Community