- ऋजुता लुकतुके
फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) ७२ तासांतील सलग दुसऱ्या हॅट ट्रीकमुळे सौदी प्रो – लीगमध्ये अल नासर संघाने आभा संघाचा ८-० असा पराभव केला. अल नासर संघाने आतापर्यंत नऊ वेळा सौदी लीग जिंकली आहे. आणि यंदाही रोनाल्डोचा संघ त्याच प्रयत्नांत आहे. अभा विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने ३ गोलबरोबरच दोन गोल करण्यात मोलाची मदतही केली.
विशेष म्हणजे रोनाल्डोची या हंगामातील ही तिसरी हॅट ट्रीक आहे. यापूर्वी अल ताय संघाविरुद्धही त्याने तीन गोल केले होते. आणि त्याच्या जोरावर अल नासर संघाने हा सामनाही ५-१ ने जिंकला होता. अभा विरुद्धच्या सामन्यानंतर आता पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटूच्या खात्यात हंगामात २९ गोल जमा झाले आहेत. आणि लीगमध्ये सध्या तोच आघाडीवर आहे.
(हेही वाचा – IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सुपरमॅनचा जंपसूट का घातला आहे?)
मध्यंतराच्या काही मिनिटं आधीच रोनाल्डोनं आपली हॅट ट्रीक पूर्ण केली. त्याचा तिसरा गोल सगळ्यात कठीण आणि तितकाच देखणा होता. डी च्या बाहेर चेंडूचा ताबा मिळाल्यावर रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) मुसंडी मारत हा गोल पूर्ण केला. यावेळी त्याने दाखवलेलं चापल्य उपस्थितांची दाद मिळवून गेलं.
मध्यंतराला रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) बदली खेळाडू देण्यात आला. पण, अल नासरचा गोलचा धडाका त्यामुळे अजिबात थांबला नाही. उलट आणखी ५ गोल साजरे झाले. अल नासर संघाने या आठवड्यात मोठे विजय मिळवले असले तरी लीगमध्ये त्यांचा संघ अजूनही अल हिलाल संघाच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. आणि दोन संघांमध्ये अजूनही १२ गुणांचं अंतर आहे.
अल हिलाल संघालाही लीगमध्ये एक धक्का बसला आहे. त्यांचा आघाडीचा खेळाडू आणि सौदी संघाचा स्टार खेळाडू अलेक्झांडर मित्रोविक हा दुखापतीमुळे उर्वरित लीग खेळणार नाहीए. त्यानेच २२ गोल करत त्याच्या संघाला अव्वल स्थानावर पोहोचवलं आहे. आता रोनाल्डोसमोर आव्हान आहे ते अल हिलालला मागे टाकण्याचं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community