CWG 2022: प. बंगालचा वेटलिफ्टर अचिंत शिऊलीने पटकावले सुवर्ण पदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा भारोत्तालक (वेटलिफ्टिंग) अचिंत शिऊली याने सुवर्ण पदक पटकावले आहे. स्नॅच राऊंडमध्ये अचिंतने १४३ किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये १७० किलो वजन उचलले. दोन्ही राऊंडमध्ये मिळून त्याने ३१३ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अचिंत अवघ्या २० वर्षांचा आहे.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, काय केली मागणी?)

त्याच्या या पदक कमाईने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळून एकूण सहा पदके प्राप्त झाली आहेत. या सहामध्ये दोन पदके महिलांनी, तर चार पुरुषांनी जिंकली आहेत. अचिंतच्या आधी वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानू आणि जेरेमी लालरिनुंगा याने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

संघर्षमय जीवन

अचिंतचे बालपण मोठ्या संघर्षात गेले. त्याचे वडील सायकल रिक्षा चालवायचे. मात्र तो आठवीत शिकत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने सर्व कुटुंबावर अजून एका संकटाची भर पडली. घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर घराचं पालन-पोषण होणाऱ्या पोल्ट्री फॉर्मवर लांडग्यांनी हल्ला केला आणि कोंबड्या फस्त केल्या. अशा परिस्थितीत कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागत होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी अचिंतवरही कमाई करण्याची जबाबदारी आली. त्याने साडीत भरतकाम आणि शिवणकाम करण्यास सुरुवात केली. पुढे तो कुशल शिंपी (टेलर) बनला.

दरम्यान तो पहिल्यांदा स्थानिक जिममध्ये गेला. अचिंतचा मोठा भाऊ वेटलिफ्टर होता. त्याच्याकडून भारोत्तोलन आणि शिवणकाम या दोन्ही गोष्टी वारसा हक्काने त्याने शिकून घेतल्या. अचिंतचे वडील हयात असेपर्यंत त्याचा मोठा भाऊ वेटलिफ्टिंग करत होता.

याआधी दोन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकावले

अचिंतने २०१९ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. वरिष्ठ गटातील हे त्याचे पहिले पदक ठरले. २०२१ मध्ये त्याने ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. याशिवाय ताश्कंद येथे झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक पटकावले होते.

पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

अचिंता शिऊली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिभावान अचिंता शिऊलीने सुवर्णपदक जिंकले याबद्दल आनंद झाला. तो त्याच्या शांत स्वभावासाठी आणि चिकाटीसाठी ओळखला जातो. या विशेष कामगिरीसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here