- ऋजुता लुकतुके
नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता आणि भारताचा नंबर वन डी गुकेशने (D Gukesh) सातव्या फेरीअखेर संयुक्त अव्वल स्थान पटकावलं आहे. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पारंपरिक बुद्धिबळातील आपली प्रगल्भता गुकेशने दाखवून दिली आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीचा सराव गुकेशने पी हरिकृष्णा बरोबरच केला होता. त्या तयारीतील अनुभवाचा वापर करत गुकेशने चिनी पद्धतीने डावाची सुरुवात करताना सुरुवातीपासून गुकेशने हरिकृष्णावर दबाव ठेवला. त्यातच हरिकृष्णाच्या थोड्या कमजोर पंधराव्या चालीचा फायदा घेत गुकेशने मधल्या खेळावर नियंत्रण कायम राखलं.
३८ वर्षीय हरिकृष्णाने आपल्या दोन्ही धोड्यांच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला गुकेश (D Gukesh) बधला नाही. उलट २० व्या चालीत त्याने हत्तीही आक्रमकपणे बाहेर काढला आणि तिथेच हरिकृष्णाचा बचाव दुबळा पडत गेला. अखेर ४५ व्या चालीवर हरिकृष्णाने आपला पराभव मान्य केला.
(हेही वाचा – ICC T20 Team of 2024 : आयसीसीच्या सर्वोत्तम टी-२० संघात यंदा ४ भारतीय, तर रोहित शर्मा कर्णधार)
या स्पर्धेला बुद्धिबळातील विम्बल्डन मानलं जातं. सातव्या फेरीनंतर आता ७ पैकी ५ गुण मिळवून गुकेशने (D Gukesh) प्रग्यानंदाच्या साथीने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे. गुकेश या सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळत होता. दुसरीकडे प्रग्यानंदाने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना ग्रँडमास्टर जॉर्डन व्ही फॉरिस्ट बरोबरचा सामना बरोबरीत सोडवला. सिसिलियन बचाव रणनीती त्याने अचूकपणे वापरली.
सोळाव्या चालीलाच दोघांनी राण्यांची अदलाबदल केली होती. त्यामुळे सामना अनिर्णित राहणार याची अटकळ होतीच. फॉरिस्टने डावाच्या मध्यावर रचलेल्या दोन तगड्या चालींना प्रग्यानंदाने अचूक उत्तर दिलं. अखेर दोघांनी बरोबरी मान्य केली. प्रग्यानंदा आणि गुकेश (D Gukesh) स्पर्धेत चांगली कामगिरी करत असताना अर्जुन एरिगसीचा खराब फॉर्म सुरूच आहे. त्याला स्पर्धेतील चौथा पराभव सहन करावा लागला आहे. ३ बरोबरींचे दीड गुण मिळवून तो गुणतालिकेत तळाला आहे. तर पी हरिकृष्णा आठव्या स्थानावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community